तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीची पुनर्रचना करताना गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार लुईझिन फालेरो यांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यांना या समितीतून वगळण्यात आल्याने राज्यात हा विषय चर्चेचा बनला आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फालेरो यांना गोव्यातील तृणमूलचा चेहरा बनवून राष्ट्रीय कार्यकारी समितीमध्ये स्थान दिले होते. मात्र फालेरो यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल कॉंग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीत मतदारांवर जास्त प्रभाव पाडू शकला नाही. त्यामुळे फालेरो यांना पुनर्रचना केलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आले नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
फालेरो यांच्याकडून राजकीय स्तरावर तृणमूल खूप अपेक्षा बाळगून होता; मात्र त्यांच्याकडून अपेक्षांची पूर्तता होऊ शकली नाही. तसेच शेवटच्या क्षणी फालेरो यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला. त्यामुळे तृणमूलवर दुसरा उमेदवार उभा करण्याची नामुष्की ओढवली होती. कदाचित फालेरोंचा हा निर्णय पक्षश्रेष्ठींना रुचला नसावा. त्यामुळे सुद्धा त्यांना कार्यकारी समितीतून वगळण्यात आले असावे, अशीही चर्चा सुरू आहे.