राज्यातील राष्ट्रीय महामार्गांचे रूंदीकरण डिसेंबरपर्यंत सुरू

0
151

गोव्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या रुंदीकरणाचे काम येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत दिली. प्रश्‍नोत्तराच्या तासाला रोहन खंवटे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.राष्ट्रीय महामार्ग १७चे म्हापसापासून मडगांवपर्यंत सहापदरीकरण करण्यात येईल तर मडगांव ते पोळेपर्यंत या मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
राष्ट्रीय महामार्ग १७वर चोगम रस्ता ते पणजीच्या दिशेने उड्डाणपूल उभारण्याची सरकारची योजना आहे काय, असा प्रश्‍न त्यांनी विचार होता. त्यावर उत्तर देताना काही तांत्रिक कारणास्तव उड्डाण पुलाची योजना सरकारने बाजूला ठेवली असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.यावेळी रोहन खंवटे म्हणाले की ‘ओ कोकेरो’ जंक्शन हे अपघात प्रवण क्षेत्र असून तेथे हा उड्डाणपूल उभारण्याचे ठरले होते. तेथे तो तातडीने होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.उड्डाणपुलाविषयी पर्रीकर म्हणाले की उड्डाण पुलाचे काम अडल्याने मांडवीवरील तिसर्‍या पुलाच्या कामालाही विलंब होतो आहे. उड्डाणपुलाबाबत तांत्रिक अडचणी आल्याने काय उपाय करता येईल त्याचा अभ्यास चालू असल्याचे ते म्हणाले. राज्यातील राष्ट्रीय महामार्ग व काही पुलांचे काम सरकार हाती घेणार असून ते डिसेंबरपर्यंत सुरू होणार असल्याचे ते म्हणाले. गालजीबाग-तळपण पुलाचे कामही हाती घेण्यात येणार आहे. वरील कामांपैकी काही कामांसाठी केंद्र सरकारकडून निधी मिळणार आहे. तर अन्य कामांवर सरकारने पेट्रोलवर जो साधनसुविधा कर लागू केलेला आहे त्यातून जो महसुल मिळेल त्यातून खर्च करण्यात येणार असल्याचे पर्रीकर यांनी स्पष्ट केले.
महामार्गांचे रुंदीकरण लोकांची घरे न मोडता करण्यात येणार असल्याचे पर्रीकर यांनी नमूद केले. काही किरकोळ घरे सोडल्यास घरे मोडली जाणार नसल्याचे ते म्हणाले.