राज्यातील प्रशासन ढासळले : गोवा फॉरवर्ड

0
6

>> विजय सरदेसाईंच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना निवेदन

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने दोनापावल येथील राजभवनामध्ये राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले असून, त्यात राज्यातील प्रशासन ढासळल्याचा आरोप करत हस्तक्षेप करण्याची मागणी केली.

गोवा फॉरवर्डने आपल्या निवेदनात राज्यातील प्रशासनात लक्ष घालून नागरिकांचे कल्याण आणि सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या अनेक महत्त्वाच्या बाबींवर तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. पणजीमधील स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अपयश ही प्रमुख चिंतेची बाब आहे. 1100 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक असूनही, या प्रकल्पाला होणारा विलंब आणि निकृष्ट दर्जामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोवा फॉरवर्डने या संपूर्ण कामाच्या फौजदारी स्वरूपाच्या चौकशीची मागणी केली आणि जबाबदार कंत्राटदाराविरुद्ध एफआयआर दाखल करावा, असे निवेदनात म्हटले आहे.

कला अकादमीचा नूतनीकरण घोटाळा हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा गोवा फॉरवर्डकडून निवेदनात नमूद करण्यात आला आहे. कला अकादमी नूतनीकरणासाठी अंदाजे 80 कोटी रुपये खर्चूनही निकृष्ट काम आणि पर्यवेक्षणाच्या अभावामुळे नुकसान झाले आहे. राज्याच्या उत्पादन शुल्क कायद्यातील अलीकडील सुधारणांबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. स्मार्ट सिटी प्रकल्प आणि कला अकादमीच्या नूतनीकरणाचे स्वतंत्र ऑडिट करण्याची मागणी गोवा फॉरवर्डने केली आहे. या शिष्टमंडळात उपाध्यक्ष दिलीप प्रभुदेसाई, अश्मा सय्यद, सरचिटणीस दुर्गादास कामत आणि दीपक कळंगुटकर आदींचा समावेश होता.