राज्य सरकारचे प्रशासन पूर्णपणे कोलमडून पडले असून, त्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेच जबाबदार असल्याचा आरोप काल तृणमूल काँग्रेसने केला. पक्षाचे माध्यम समन्वयक ट्रॉजन डिमेलो व सरचिटणीस गिलरॉय कॉस्टा यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा आरोप केला. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असून लोकांवर हल्ले होऊ लागलेले असून, फसवणुकीच्या घटनांतही वाढ झाली असल्याचा आरोप डिमेलो यांनी केला. गोवा हे गुन्हेगारांसाठी एक सुरक्षित स्थळ बनले असल्याचे सांगून डिमेलो यांनी त्याविषयी चिंता व्यक्त केली. कॅसिनोंच्या संख्येत वाढ व आग्वाद किल्ल्यावर मद्यालय सुरू केल्याने राज्याचे नाव बदनाम झाले असल्याचा आरोपही त्यांनी केला. या किल्ल्यावर बार सुरू करण्यासाठी दिलेला परवाना तात्काळ मागे घेण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.