गेल्या पाच दिवसांतील पेट्रोल व डिझेल या इंधनाच्या दरवाढीमुळे राज्यात पेट्रोलच्या दराने आता शंभरी गाठली आहे. मागील सहा दिवसांपैकी पाच दिवस इंधनाच्या दरात वाढ झालेली आहे. रविवारी पेट्रोलच्या दरात आणखी ५० पैशांनी, तर डिझेलच्या दरात ५५ पैशांनी वाढ झाली. पाच दिवसांत आत्तापर्यंत ३.७० पैसे एवढी वाढ झाली आहे. पणजीसह उत्तर गोव्यात सध्या पेट्रोलचा दर १००.०६ रुपये प्रतिलीटर असा आहे. तसेच, डिझेल दराने नव्वदी पार केली असून, डिझेलचा दर ९१.०१ रुपये प्रति लीटर असा झाला आहे.
आपची पणजीत निदर्शने
आम आदमी पक्षाच्या युवा विभागातर्फे इंधन दरवाढीच्या विरोधात येथील कदंब बसस्थानकावर काल निदर्शने करण्यात आली. आपच्या युवा विभागाचे नेते सिद्धेश भगत यांनी इंधन दरवाढीचा निषेध केला आहे. इंधन दरवाढीचा सामान्य नागरिकांना फटका बसला आहे. केंद्रातील भाजप सरकारने इंधन दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी भगत यांनी केली.