राज्यातील पहिले आयुर्वेदिक, ॲलोपथिक इस्पितळ डिचोलीत उभारणार ः मुख्यमंत्री

0
6

>> इस्पितळ दीनदयाळ जनसेवा प्रतिष्ठान चालवणार

राज्यातील पहिले 50 खाटांचे एकात्मिक आयुर्वेदिक आणि ॲलोपथिक इस्पितळ डिचोली येथे पाच ते सहा महिन्यात सुरू केले जाणार आहे. इंडियन ऑईल कॉर्पेरेशनने सीएसआर निधीतून अंदाजे 10.50 कोटी खर्चून बांधलेली इस्पितळ इमारत डिचोली येथील दीनदयाळ जनसेवा प्रतिष्ठानकडे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत पर्वरी येथे मंत्रालयात एका कार्यक्रमात काल सुपूर्द करण्यात आली आहे. हे इस्पितळ दीनदयाळ जनसेवा प्रतिष्ठानतर्फे चालविण्यात येणार आहे. राज्यातील आर्थिकदृष्ट्‌‍या दुर्बल घटकांतील कुटुंबांना 10 टक्के सेवा मोफत पुरविण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

या इस्पितळाच्या माध्यमातून नागरिकांना आयुर्वेदिक सुविधा उपलब्ध होणार आहे. डिचोली येथील सहकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या दीनदयाळ पतसंस्थेने आता वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश केला आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

यावेळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, माजी सभापती राजेश पाटणेकर, प्रतिष्ठानाचे वल्लभ साळकर व इतरांची उपस्थिती होती.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने सदर हॉस्पिटल इमारत उभारणीसाठी साडेदहा कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर व मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे यासाठी विशेष सहकार्य लाभले.

दुग्धपेढीबाबत विचार
इंडियन ऑईल कॉर्पेरेशनच्या सहकार्यातील गोव्यात दुग्धपेढी (मिल्क बँक) सुरू करण्यावर विचार केला जात आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. इंडियन ऑईलच्या बायोगॅस, इथेनॉल आदी प्रकल्पांना सहकार्य करण्याची तयारी आहे. गोवा हरीत उपक्रमासाठी वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी सहकार्य केले जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.