>> राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती
राज्यातील १८६ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या जून २०२२ मध्ये होण्याची शक्यता आहे. पंचायतीच्या प्रभाग फेररचनेचा कच्चा मसुदा नागरिकांच्या सूचना आणि हरकतीसाठी खुला करण्यात आला असून, येत्या ८ मार्च २०२२ पर्यंत ग्रामपंचायत, निवडणूक अधिकारी, स्थानिक जिल्हाधिकार्यांमार्फत प्रभाग फेररचनेचा अंतिम मसुदा सादर केला जाणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त डब्लू. व्ही. रमणमूर्ती यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव महादेव आरोंदेकर, अधिकारी सागर गुरव यांची उपस्थिती होती.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया येत्या १९ जूनपर्यंत पूर्ण करण्याची गरज आहे. पंचायत निवडणुकीसाठी तालुका पातळीवर २१ निवडणूक अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोवा पंचायत राज्य कायद्यातील दुरुस्तीमुळे प्रभाग फेररचना आणि प्रभाग आरक्षणाचे काम राज्य निवडणूक आयोगाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. प्रभाग फेररचनेचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रभाग आरक्षण जाहीर केले जाणार आहे. त्यानंतर पंचायत निवडणुकीची तारीख निश्चित करून राज्य सरकारची मान्यता घेतली जाणार आहे, असे रमणमूर्ती यांनी सांगितले.
सांकवाळ पंचायतीमध्ये प्रभागात सर्वाधिक २ हजारच्या आसपास मतदार आहेत, तर नेत्रावळी ग्रामपंचायतीच्या प्रभागात सर्वांत कमी मतदार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी वापरलेल्या मतदार यादीचा वापर करून पंचायत प्रभाग मतदार याद्या तयार केल्या जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.
२ मार्चपर्यंत हरकती स्वीकारणार
ग्रामपंचायत प्रभाग रचना तयार करण्यासाठी वेबआधारित सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला. प्रभाग रचना भौगोलिक संलग्नता, नैसर्गिक सीमा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. नागरिकांच्या या प्रभाग रचनेबाबत सूचना व हरकती येत्या २ मार्चपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर प्रभाग फेररचनेला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. राज्य सरकारची मान्यता घेऊन प्रभाग फेररचना जाहीर केली जाणार आहे, असेही रमणमूर्ती यांनी सांगितले.