>> गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांचा पत्रकार परिषदेत आरोप
राज्यातील जलमार्गांनी कोळसा वाहतूक सुरू करण्याचा सरकारचा विचार असून, त्यासाठी राज्यातील मांडवी व झुआरी या नद्यांसह एकूण चार नद्या सुमारे 10 मीटर एवढ्या खोल उपसण्याची योजना सरकारने आखली असून, त्यावर 310 कोटी रुपये खर्च करण्याची सरकारची योजना असल्याचा आरोप काल गोवा फॉरवर्डचे प्रमुख व आमदार विजय सरदेसाई यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
या नद्यांतील गाळ अशा प्रकारे उसपण्यात आल्यास पर्यावरणावर त्याचे गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. सुमारे 3.5 हजार टन क्षमतेच्या बार्जेस या नद्यांतून नेता याव्यात यासाठी हा सगळा घाट घातला जात आहे. नदीतून कोळसा नेण्यासाठीच या एवढ्या मोठ्या महाकाय अशा बार्जेसची सरकारला गरज भासणार असल्याने त्यासाठी ही सोय केली जात आहे. मात्र, हे सगळे करताना या नद्यांच्या पर्यावरणावर कोणता अनिष्ट परिणाम होणार आहे याचा विचार केला जात नसल्याचे सरदेसाई म्हणाले.
मांडवी नदीवर जे दोन मोठे मनोरे उभारण्यात येत आहेत तेही या बार्जेसवर लक्ष ठेवण्यासाठीच उभारण्यात येत असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला. सार्वजनिक वाहतुकीसाठी हे केले जात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न सरकारकडून होऊ शकतो. त्यामुळे जनतेने या कामाला विरोध करावा, असे आवाहन सरदेसाई यांनी केले.
310 कोटींच्या या कामासाठी डीपीआर काढण्यात आलेला असून, त्याला लोकांनी जोरदार विरोध करावा, अशी सूचना सरदेसाई यांनी केली.
गोव्यातील मांडवी, झुआरी आदी नद्यांची खोली ही काही ठिकाणी दीड मीटर एवढी कमी आहे. आता या नद्यांतील गाळ उपसून त्या आणखी 10 मीटर एवढ्या खोल बनवण्यात आल्यानंतर या नद्यांच्या पर्यावरणावर मोठा अनिष्ट परिणाम होण्याची भीती सरदेसाई यांनी व्यक्त केली. कोळसा व लोहखनिजाच्या वाहतुकीसाठी हे सगळे केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.