मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती
राज्यातील गुन्हेगारीत 28.83 टक्के एवढी घट झाली आहे. पोलीस खात्याचे गुन्हे तपासणीचे प्रमाण 85 टक्के एवढे आहे. राज्यातील जमीन घोटाळ्यासंबंधी एसआयटीचा अहवाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातील बेकायदा कॅसिनोवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. पोलीस स्थानकावरील कर्मचाऱ्यांची कमतरता प्रशिक्षण घेणारे नवीन पोलीस कर्मचारी सेवेत रुजू झाल्यानंतर भरून येणार आहे. आयआरबी पोलिसांची भरती केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गृह, पोलीस आदी खात्याच्या अनुदानित पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना काल दिली.
सायबर गुन्ह्यासंबंधीच्या तक्रारी राज्यभरातील पोलीस स्थानकांवर नोंदविल्या जाऊ शकतात. त्या तक्रारी सायबर गुन्हा विभागाकडे हस्तांतरित केल्या जाऊ शकतात. 130 होमगार्डना पोलीस खात्यात रुजू करून घेण्यात आले आहे. होमगार्ड म्हणून 10 वर्षे सेवा बजावलेल्यांना 50 वर्षापर्यंत होमगार्डना थेट भरतीची संधी दिली जात आहे. अग्निशामक दलासाठी मोठ्या तीन क्रेन खरेदी केल्या जाणार आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
स्वातंत्र्यसैनिकांची 133 मुले नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. 60 जणांना 15 ऑगस्टपर्यंत नोकरी दिली जाणार आहे. शिल्लक राहणाऱ्यांना ऑक्टोबरपर्यत नोकरी मिळवून दिली जाणार आहे. कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहातील काही कैदी उच्च शिक्षित झाले आहेत. काही कैद्यांनी पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. राज्य सरकारने जाहिरात धोरण तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. जाहिरातीबाबत एक याचिका न्यायालयात सुरू आहे, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
कॅसिनो घोटाळ्याची चौकशी
राज्यातील कथित 10 हजार कोटींच्या कॅसिनो घोटाळ्याची चौकशी केली जात आहे. दक्षता खात्याकडे 2743 तक्रारी नोंद झाल्या आहेत. त्यातील 1900 तक्रारी निकालात काढण्यात आल्या आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.