चोवीस तासांत नवे 18 बाधित
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्येने शंभरचा आकडा ओलांडला असून कोरोना बाधितांची संख्या आता 103 एवढी झाली आहे. राज्यात नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ सुरू असून गेल्या चोवीस तासांत नवीन 18 बाधित आढळून आले आहेत. राज्यात मागील पाच दिवसांत नवीन 81 कोरोना बाधित आढळून आले आहेत.
नवीन कोरोनाबाधिताची संख्या वाढत असली तरी, अजूनपर्यंत एकाही बाधिताला इस्पितळात दाखल करावा लागलेला नाही. चोवीस तासांत 346 स्वॅबच्या नमुन्याची चाचणी करण्यात आली आहे. चोवीस तासांत एकही रुग्ण बरा झाल्याची नोंद नाही.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
राज्यातील कोरोनाबाधिताची वाढती संख्या चिंताजनक आहे. नागरिकांनी गाफील न राहता मास्क व इतर सुरक्षा उपाय योजनाचा अवलंब करावा, असे आवाहन डॉ. शेखर साळकर यांनी काल केले. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारवर अवलंबून राहू नये. तर, नागरिकांनी वेळीच सावधगिरी बाळगली पाहिजे. नागरिकांनी घराबाहेर फिरताना मास्कचा वापर करायला सुरुवात केली पाहिजे. तसेच, विवाह व इतर कार्यक्रमांत सहभागी होताना काळजी घेतली पाहिजे, असेही डॉ. साळकर यांनी सांगितले.
एच3एच2 चे रुग्ण नाहीत
राज्यात नवीन बाधितांची संख्या वाढत असली तरी नवीन एकाही बाधिताला इस्पितळात दाखल करावा लागलेला नाही. ही एक जमेची बाजू आहे. राज्यात आढळून येणारे नवीन बाधित ओमिक्रॉन व्हायरसचे रुग्ण असू शकतात. राज्यात एच3एच2 चे बाधित अजूनपर्यंत आढळून आलेले नाहीत. तथापि, काही संशयित बाधिताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अनेक नागरिक कोविड वगळता इतर आजारांवर उपचार घेण्यासाठी इस्पितळामध्ये दाखल होत आहेत, असेही डॉ. साळकर यांनी सांगितले.
देशभरात एच3एन2 सोबत
कोरोना रुग्णसंख्येत वाढ
देशात एकीकडे एच3एन2 इन्फ्लूएंझा विषाणूसोबतच आता कोरोनाचेही रुग्ण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळसह गोव्यातही कोरोना रुग्णांची वाढत असून याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झाले आहे. सध्या देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या पाच हजारांच्या पुढे गेली आहे.
गेल्या 109 दिवसांनंतर देशात कोविड-19 चे 5000 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी 17 मार्च रोजी एका दिवसात कोरोना विषाणू संसर्गाच्या 796 प्रकरणांची नोंद झाली आहे.
220 कोटींपेक्षा अधिक लशी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सक्रिय रुग्णांची संख्या 5,389 च्या पुढे पोहोचली आहे. तसेच पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या 5,30,795 झाली आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लशीचे 220 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत.
पाच जणांचा मृत्यू
कोरोनामुळे कर्नाटक, हिमाचल प्रदेश, पुद्दुचेरी आणि उत्तर प्रदेश आणि केरळमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्यानुसार, देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98.80 टक्के आहे. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून आतापर्यंत 4,41,57,685 रुग्णांनी या संसर्गावर मात केली आहे. दहा जणांचा मृत्यू
देशात एच3एन2 इन्फ्लूएंझामुळे रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. देशात आतापर्यंत इन्फ्लूएंझामुळे दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.