राज्यातील कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या ४३ झाली आहे. कोरोना विषाणूची बाधा झालेले नवीन ४ रुग्ण आढळून आले असून कोरोना संशयित ५ रुग्णांना जीएमसीच्या खास विभागात दाखल करण्यात आले आहे. कोरोना आयझोलेेशन वॉर्डात कोरोना संशयित १० जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.
जीएमसीच्या कोविड प्रयोगशाळेत २४ तास कोरोना विषाणूच्या नमुन्याची तपासणी केली जाते. ५९५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून ५३९ नमुने नकारात्मक आहेत आणि ४ नमुन्यांचा अहवाल सकारात्मक आला आहे. आणखी ५२ लाळेच्या नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. आंतरराज्य प्रवास केलेल्या ८६ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. तर, ३२२ जणांना सरकारी क्वारंटाईऩ सुविधेखाली आणण्यात आले आहेत. सरकारी क्वारंटाईनखाली ८३७ जणांना ठेवण्यात आले आहेत, असेही आरोग्य सचिव मोहनन यांनी सांगितले.
राज्यातील कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांचा एकूण संख्या ५० झाली आहे. राज्यातील ७ कोरोनाची बाधा झालेले रुग्ण बरे झाले असून ४३ जणांवर मडगाव येथील कोविड इस्पितळामध्ये उपचार सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, राजधानी एक्सप्रेसमधून आलेल्या आणखी दोन प्रवाशांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. पुण्यातून आलेल्या एका युवतीला कोरोनाची बाधा झालेली आहे. तसेच मुंबईतून आलेल्या तटरक्षक दलाच्या अधिकार्याला कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे, असेही मोहनन यांनी सांगितले.
ट्रुनेट स्क्रिनिंगमध्ये बाधीत आढळून येणार्याची गोमेकॉच्या कोविड प्रयोगशाळेत पुन्हा चाचणी घेतली जाते. म्हापसा, मडगाव, फोंडा आणि चिखली येथे ट्रुनेट स्क्रिनिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. रक्ताचा नमुना घेऊन कोरोनाची रॅपीड टेस्ट केली जात नाही, असेही आरोग्य सचिव मोहनन यांनी सांगितले.
मोले तपासणी नाक्यावरून तीन कोरोनाबाधित व्यक्तींनी राज्यात प्रवेश केल्याने मोले तपासणी नाक्यावरील संबंधित पोलीस व इतर खात्याच्या कर्मचार्यांची कोविड चाचणी केली असता ती नकारात्मक आली.
केंद्र सरकारकडे गोव्यात येणारी रेल्वेगाडी बंद करण्यासंबंधीचा विषय मांडण्यात आलेला आहे. राज्यातील प्रमुख सीमा नाक्यावरील पोलीस व इतर कर्मचार्यांना सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना हाती घेतली जात आहे, असेही आरोग्य सचिव मोहनन यांनी सांगितले. यावेळी माहिती खात्याचे सचिव संजय कुमार, माहिती खात्याच्या संचालिका मेघना शेटगावकर यांची उपस्थिती होती.