>> वाळपईतील मेळाव्यात जे. पी. नड्डा यांचे आवाहन
गोव्याचा विकासाची गंगा आणायची असेल तर गोमंतकीय जनतेने भारतीय जनता पक्षाला साथ द्यावी असे आवाहन काल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी वाळपई येथे केले. वाळपई बसस्थानकाच्या सभागृहात झालेल्या सत्तरी तालुका भाजप कार्यकर्ता मेळाव्यात नड्डा बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, गोवा प्रभारी सी. टी. रवी, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, मध्य प्रदेशातील खासदार सय्यद झापर, माजी उपसभापती नरहरी हळदणकर, होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, नगरगाव जिल्हा पंचायत सदस्य राजेश्री काळे, केरी जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, उसगाव जिल्हा पंचायत सदस्य उमाकांत गावडे, वाळपई नगराध्यक्ष शेयजीन शेख, पर्ये भाजप मंडळाचे अध्यक्ष गोविंद कोरगावकर, वाळपई भाजप मंडळाचे अध्यक्ष रामनाथ डांगी, तसेच बाराही पंचायतींचे सरपंच उपस्थित होते.
नड्डा यांनी, सत्तरी तालुक्यातील दोन्ही जागांवर कमळ फुलवण्याचे आवाहन उपस्थितांना केले. श्री. नड्डा यांनी यावेळी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.
विश्वजीत व माझ्यात
दुरावा नाही ः मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बोलताना सुरवातीलाच आपल्यात व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यामध्ये कोणताच दुरावा नसल्याचे सांगून ही सगळी कारस्थाने विरोधी पक्ष करीत असल्याचा आरोप केला. येत्या विधानसभा निवडणुकीत सत्तरीतील दोन्ही मतदारसंघ धरून राज्यात २२ पेक्षा अधिक आमदार निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
विश्वजीत राणे भावूक
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी स्वागत केले. यावेळी या मेळाव्यासाठी जमलेले कार्यकर्ते पाहून विश्वजीत राणे भावूक झाले. यावेळी राणे यांनी, सत्तरीतून दोन्ही भाजपचे उमेदवार निवडून होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचेही समयोचित भाषण झाले.
मेळाव्यातील ठळक वैशिष्ट्ये
या सभेला सुमारे आठ हजार नागरिकांनी गर्दी होती. त्यामुळे आयोजकांना सभागृहाबाहेर मंडप उभारून स्क्रीनची व्यवस्था करावी लागली.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या भाषणाला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत होता. त्यांच्या प्रत्येक वाक्याला टाळ्यांचा कडकडाट होत होता.
सभागृहात प्रचंड गरमी असतानाही तीन तास एकही कार्यकर्ता जागेवरून हालला नाही.
दोन्ही मतदारसंघातील कार्यकर्त्यांना सभा स्थळी आणण्यासाठी बसची व्यवस्था केली होती.
मेळाव्याला आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या पत्नी डॉ. दिव्या राणे यांची प्रेक्षकांमध्ये खास उपस्थिती होती.