>> कृषीमंत्री रवी नाईक यांची माहिती; मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द; लवकरच मंत्रिमंडळाकडून मंजुरी
राज्याच्या कृषी खात्याने नवे कृषी धोरण तयार केले असून, या धोरणाचा मसुदा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला असल्याची माहिती कृषीमंत्री रवी नाईक यांनी दै. ‘नवप्रभा’शी बोलताना काल दिली. राज्य मंत्रिमंडळासमोर ह्या धोरणाचा मसुदा ठेवून त्याला मान्यता मिळवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कृषी धोरणाची अंमलबजावणी झाल्यानंतर राज्यातील कृषी व्यवसायाला गती व चालना मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्यात आता भाजी उत्पादनालाही वेग आलेला असून, भेंडी, मिरची आदी उत्पादन मोठ्या प्रमाणता वाढलेले आहे. हे उत्पादन अन्य राज्यांतही पाठवले जात असल्याचे कृषीमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांना अनुदानही दिले जात आहे. ज्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झाले होते, त्या सर्वांना नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. त्यात भातशेतेी उत्पादन घेणारे शेतकरी, अन्य बागायतदार व भाजी उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्यांच्याकडे कृषी कार्डे आहेत, त्यांना नुकसानभरपाई देण्यात आलेली आहेच. त्याशिवाय ज्यांच्याकडे कृषी कार्डे नाहीत, त्यांनाही नुकसानभरपाई देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
मडगाव शहरात कृषी खात्याने कृषी प्रशिक्षण केंद्र सुरू केलेले असून, या केंद्राला युवा वर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या सुमारे 65 विद्यार्थ्यांनी या केंद्रातून प्रशिक्षण घेतल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. त्यात काणकोण, सांगे, सावर्डे व अन्य भागांतील विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.
आता यांत्रिक पद्धतीने शेती करण्यावर भर देण्यात येणार असून, शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची सुविधाही उपलब्ध करून देण्याबरोबरच अन्य आवश्यक यंत्रे व अवजारे उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘संजीवनी’त इथेनॉल निर्मितीचा निर्णय
राज्यातील संजीवनी सहकारी साखर कारखाना सध्या बंद असून, तेथे साखरेचे उत्पादन करण्यात अडचणी आहेत. आणि त्यामुळेच तो बंद ठेवलेला आहे. आम्ही आता तेथे ‘इथेनॉल’चे उत्पादन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. इथेनॉल हे ऊसापासूनही तयार करता येते. तांदळापासूनही ते तयार केले जाऊ शकते. त्याबाबत योग्य तो निर्णय घेऊन कारखाना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देखील कृषीमंत्री रवी नाईक यांनी यावेळी दिली.