राज्याचा अर्थसंकल्प 8 फेब्रुवारी रोजी

0
23

>> मोदींच्या गोवा दौऱ्यामुळे अधिवेशनात बदल

राज्य विधानसभेत राज्याचा वार्षिक 2024-25 चा अर्थसंकल्प येत्या 8 फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 6 फेब्रुवारीच्या गोवा दौऱ्यामुळे विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजात थोडा बदल करण्यात आला असून या दिवसाचे कामकाज 10 फेब्रुवारीला घेतले जाणार आहे.

राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प येत्या 8 फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सल्लागार समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2 ते 9 फेब्रुवारीला घेण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. पर्वरी येथील विधानसभा संकुलात विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विधानसभा अधिवेशनातील कामकाजावर काल चर्चा करण्यात आली.
कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गोवा दौऱ्यामुळे विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजात थोडा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामुळे 6 फेब्रुवारीला विधानसभेचे कामकाज होणार नाही. या दिवशीचे कामकाज 10 फेब्रुवारीला घेतले जाणार आहे, अशी माहिती सभापती रमेश तवडकर यांनी बैठकीनंतर बोलताना दिली.

या बैठकीला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, आमदार विंन्झी व्हिएगश, आमदार वीरेश बोरकर यांचीही उपस्थिती होती.
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामुळे 6 फेब्रुवारीचे कामकाज 10 फेब्रुवारीला घेण्यास विरोधकांनी मान्यता दिली आहे. या बैठकीत विरोधी आमदारांनी अतारांकीत प्रश्नाची संख्या 15 वरून 25 पर्यंत वाढविण्याची मागणी केली आहे. तसेच, आमदारांच्या प्रश्नांची उत्तरे 48 तासांपूर्वी देण्याची मागणी करण्यात आली आहे. आमदारांना प्रश्नांच्या उत्तरात मागील 5 वर्षांची माहिती देण्याचे बंधन घालण्यात आले आहे. ही माहिती 15 वर्षांपर्यंत वाढण्याची मागणी करण्यात आली आहे. आमदारांना मागील पाच वर्षांच्या माहितीचे बंधन अयोग्य आहे. याबाबत सभापती आवश्यक निर्णय घेणार आहेत, असेही आमदार सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.