येत्या ११ जून रोजी राज्यसभेच्या ५५ जागांसाठी होणार असलेली निवडणूक चुरशीची ठरणार असून इंडिया टुडे वृत्तवाहिनीने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये कर्नाटकातील चार आमदार मतांसाठी कोट्यवधी रुपयांची मागणी करीत असल्याचे उघड झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया टुडे या आघाडीच्या वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये कॉंग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकातील जनता दल (सेक्युलर)चे दोन आमदार, जनता पक्ष व एक अपक्ष मिळून चार आमदार मत देण्यासाठी कोट्यवधी रुपये मागत असल्याचे वृत्तवाहिनीने प्रसारण केल्यानंतर लोकप्रतिनिधींचा बुरखा फाडला गेला आहे.
मतांसाठी सौदेबाजी करताना जनता दल (सेक्युलर)चे बसवकल्याण मतदारसंघाचे आमदार मल्लिकार्जुन खुबा हे मध्यस्थ पत्रकारापाशी पाच कोटी रुपयांची मागणी करताना वाहिनीवर दाखविण्यात आले आहे. जनता दल (सेक्युलर)चे अन्य एक आमदार जी. टी. देवेगौडा मतांचा दर ठरविण्यासाठी वाटाघाटी करताना स्टिंगच्या सापळ्यात अडकले आहेत. त्यांचे जावई दहा कोटींची बोली लावतानाचे चित्रीकरण कॅमेराबद्ध झाले
आहे.
केजीपीचे आलंद (गुलबर्गा) मतदारसंघाचे आमदार बी. आर. पाटील यांनाही मतांसाठी पैशांची मागणी करताना कॅमेर्यात चित्रित करण्यात आले आहे. राज्यसभेसाठी मते विकणे व खरेदी करणे ही एक राजकीय खेळी असल्याचे पाटील यांचे संभाषण वाहिनीवर दाखविण्यात आले आहे. एक अपक्ष आमदारही मत देण्यासाठी पैसे मागत असल्याचे स्टिंगमध्ये दाखविण्यात आले आहे.