>> आज शाळा-कॉलेजना सुट्टी
>> पावसाच्या थैमानामुळे नद्यांना पूर
>> प्रचंड पडझडीमुळे खासगी, सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान
सतत कोसळणार्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने आज बुधवार दि. ७ रोजी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांसह सर्व शैक्षणिक संस्थांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. सुटीसंबंधीचे परिपत्रक शिक्षण खात्याने काढले असून शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी काल पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. राज्यात सर्वत्र धुवांधार पाऊस कोसळत असून सर्वत्र पूरसदृश्य स्थिती आहे. त्यामुळे आम्ही शैक्षणिक आस्थापनांना आज बुधवारी एका दिवसाची सुटी जाहीर केली असल्याचे सावंत यानी सांगितले. मंगळवारीही (दि. ६) काही शाळांनी विद्यार्थ्यांना सुटी दिली होती. राज्यात आतापर्यंत ९८ इंच पाऊस नोंद झाला आहे.
जोरदार पाऊस, त्यातच भरती यामुळे कित्येक गावात पुराचे पाणी घुसल्याचे सावंत म्हणाले. विविध ठिकाणच्या सखल भागांतील लोकांनी अन्यत्र हलवण्यात आले असल्याचेही त्यानी सांगितले. पणजीच्या मळा परिसरातील काही घरांत सोमवारपासून पाणी घुसू लागले होते. या भागातील काही लोकांना अन्यत्र हलवण्यात आल्याची माहिती सावंत यानी दिली.
प्रलयंकारी स्थितीमुळे घबराट
गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळणार्या मुसळधार पावसामुळे राज्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झालेली असून काणकोणपासून पेडणे अशा राज्यातील सर्वच भागात काल जोरदार पावसामुळे परिस्थिती बिकट बनली होती. दरडी कोसळणे, वृक्ष उन्मळून पडणे, रस्ते पाण्याखाली जाणे, घरांत पाणी घुसणे अशा घटना गोव्याभर घडल्या. पावसामुळे जणू काल संपूर्ण गोवा गोरठला होता.
सतत कोसळणार्या पावसामुळे राज्यातील नदी-नाल्यांना पूर आलेला असून ते दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत होते.
दरम्यान कुठ्ठाळी येथे सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी जो डोंगर कापण्यात आला होता. त्या डोंगराची दरड सोमवारी जोरदार पावसामुळे कोसळून पडल्याने सोमवारपासून पणजी-मडगाव मार्गावरील वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली. कोल्हापूर महामार्गावर पुराचे पाणी असल्याचे कळताच बसेस गारगोटी, देवगड या अंतर्गत रस्त्याने नेण्यात आल्या. पण ह्या रस्त्यांवर पूर्वीपासूनच पाणी होते. पण बसचालकांना कल्पना नसल्याने त्यानी बसेस तशाच पुढे नेल्या. राधानगरी येथे पोचल्यावर संपूर्ण गावच पाण्याखाली गेले असल्याचे आढळून आले. महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने नंतर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.
चोर्ला घाटात दरडी
कोसळल्याने वाहतूक खोळंबली
चोर्ला घाटात काल दरडी कोसळल्यामुळे बेळगावहून होणारी वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे गोव्यात होणार्या दूध व भाजी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला.
उत्तर गोव्यात अनेक
कुटुंबांना अन्यत्र हलविले
राज्याला संततधार पावसाने सलग तीन दिवस झोडपून काढल्याने अनेक भागात सोमवार, मंगळवारी सकाळच्या सत्रात पूरस्थिती निर्माण झाली. राज्यात मागील चोवीस तासात ५.३६ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर, राज्यभरात गेल्या तीन दिवसात १३ इंच पावसाची नोंद झाली आहे. उत्तर गोव्यातील वाळपई, साखळी भागांना जोरदार पावसाने झोडपून काढले. वाळपई येथे ९.४२ इंच आणि साखळी येथे ८.२९ इंच पावसाची नोंद झाली आहे. म्हादईला पूर आल्याने नदीच्या आसपासच्या काही भागात पूरस्थिती निर्माण झाली. तसेच अंजुणे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाचे चारही दरवाजे उघडण्यात आल्याने साखळी, डिचोली भागात पूरस्थिती निर्माण झाली. उसगाव, वाघुर्मे, वळवई, खांडेपार या भागात पूरस्थिती निर्माण झाली. स्थानिक प्रशासनाने अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले.
गिरी म्हापसा येथे राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. राज्यभरात अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. राज्यभरात अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. अनेक घरात पावसाचे पाणी साचल्याने नुकसान झाले आहे.
आतापर्यंत ९८ इंच पावसाची नोंद
राज्यात आत्तापर्यत ९८ इंच पावसाची नोंद झाली आहे. वाळपई येथे आत्तापर्यत सर्वांधिक १२३.०६ इंच पावसाची नोंद झाली आहे. सांगे आणि साखळी येथेही पावसाने इंचाचे शतक पूर्ण केले आहे. मागील चोवीस तासात वाळपई, साखळीनंतर पेडणे येथे ६.७० इंच, ङ्गोंडा येथे ५.४७ इंच पावसाची नोंद झाली आहे.
अतीवृष्टीमुळे गोव्याला येणार्या अनेक रेलगाड्या रद्द
अतिवृष्टीमुळे रेल्वेमार्गावर पाणी भरले व माती पडल्याने मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने रेल्वे गाड्या रद्द केल्या. लोंढा ते तिनईघाटात दरड कोसळली क्रमांक १८०४८ गाडी व्हीसीजी अमरावती गाडी रद्द केली. तसेच वास्को लोंढा गाडी रद्द केली.
ट्रेन क्रमांक ११०२८ अर्नाकुलम पुणे पूर्ण गाडी पनवेल मार्गे वळविण्यात आली. पाटना वास्को ट्रेन क्रमांक १२७४२ ही मिरजहून बेळगांवमार्गे पाठविली. ट्रेन क्रमांक १२४३२ निझाबुद्दीन राजधानीला पाच तास विलंब झाला.
ट्रेन क्रमांक २२११३ लोकमान्य टिळक स्टेशन केसीव्हीएल जलद गाडी रद्द केली. वास्को निझामुद्दीन गोवा गाडी वास्को ते लोंढा रद्द केली. कारवार – व्हायपीआर मडगाव ते एचएएस गाडी रद्द केली.
अर्नाकुलम निजामुद्दीन गाडी पाच तास विलंबाने सुटली. बर्याच गाड्या पाच ते दहा तास विलंबाने सुटल्या.