राज्यभरात काल दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. गोव्यातील हजारो घरांत दीपावली उत्सवानिमित्त लक्षदीप उजळले. राज्यभरात रविवारी पहाटे नरकासुराच्या प्रतिमा जाळण्यात आल्या. तत्पूर्वी शनिवारी रात्रौ गावागावात नरकासूर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आबाल-वृद्धांनी त्यात भाग घेऊन आनंद द्विगुणित केला. रविवारी पहाटे सुवासिनींनी घराघरात पुरुषांना आरती ओवाळून घरात प्रवेश दिला. नंतर पोहे, मिठाई वगैरे खाऊन भाविकांनी दिवाळी सण उत्साहात साजरा केला.
दिवाळी सणानिमित्त लोकांनी एकामेकांच्या घरी जाऊन तसेच समाज माध्यमाद्वारे एकामेकांना सणाच्या शुभेच्छा दिल्या.
घरोघरी काल आकाशकंदिल लावण्यात आले. दिवाळीनिमित्त पणत्या पेटल्या. रांगोळीची सजावट करण्यात आली.
संध्याकाळी घरोघरी तसेच कार्यालये, व्यावसायिक व औद्योगिक आस्थापने येथे थाटामाटात लक्ष्मी पूजन करण्यात आले. लक्ष्मी पूजनानिमित्त सर्वत्र लख्ख दिवे व पणत्यांच्या प्रकाशाने परिसर उजळून निघाले होते. लक्ष्मीपूजनानिमित्त शहरे तसेच गावागावातील बाजारपेठांमध्ये मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. भक्तिभावाने केले जाणारे लक्ष्मीपूजन व मंत्रोपचार आणि भक्तीगीते यामुळे सर्वत्र आनंदी व भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.