>> राज्य सरकारसोबतच्या संघर्षाची परिणती
>> भगतसिंह कोश्यारींकडे अतिरिक्त ताबा
गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वत:ची एक वेगळी छाप सोडलेले सत्यपाल मलिक यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल मेघालयाचे राज्यपाल म्हणून बदली केली. त्यांच्या जागी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अतिरिक्त ताबा दिला. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत व राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यामध्ये दोनवेळा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे सत्ताधारी भाजप व राज्य सरकार यांचे राज्यपालांबरोबर एका प्रकारचे शीतयुद्धच सुरू झाले होते.
गेल्या २४ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांनी राज्यात नवे राजभवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, राज्यपालांनी सदर प्रस्तावाला विरोध करताना नव्या राजभवनची आवश्यकता नसून कोविडमुळे अर्थव्यवस्था कोसळलेली असताना सरकारने नवे राजभवन बांधण्यासाठी पैसे खर्च करू नयेत असा सल्ला दिला होता. यावेळी त्यांनी आपणाला नव्या राजभवनची गरज नसल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री दुखावले होते. या पार्श्वभूमीवर काल राज्यपालांची बदली झाल्याचा आदेश आल्यानंतर कॉंग्रेस, मगो व गोवा फॉरवर्ड ह्या तिन्ही विरोधी पक्षांनी या बदलीसंबंधी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज्यपाल मलिक हे सत्य बोलत असल्याने व भाजपला सत्य सहन होत नसल्याने त्यांची बदली करण्यात आल्याची टीका विरोधी पक्षांनी केली.
राजभवन घटनेच्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना पत्रकार कोरोनासंबंधीचे वार्तांकन करताना चुकीची माहिती देत असून त्यामुळे राज्यपालही प्रसारमाध्यमांवर नाराज असल्याचे म्हटले होते. मात्र, नंतर मलिक यांनी त्याचे खंडन करताना मुख्यमंत्री खोटे बोलत असून आपण तसे कधीच म्हटले नव्हते. असे स्पष्टीकरण दिले होते. उलट प्रसारमाध्यमे चांगले काम करीत आहेत असे आपले म्हणणे होते असे सांगून मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना उघडे पाडले होते. वरील दोन्ही घटनांमुळे राज्य सरकार व राज्यपाल यांच्यात एका प्रकारे शीतयुद्धच सुरू झाले होते.
विरोधकांची जोरदार टीका
या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस राज्यपालांची बदली होणार असल्याचे बोलले जात होते. काल शेवटी राज्यपालांच्या बदलीचा आदेश आला आणि त्यासंबंधी विरोधी पक्षांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. राज्यातील भाजप सरकारला कुणी सत्य बोललेले सहन होत नाही. म्हणूनच राज्य सरकारने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संपर्क साधून राज्यपालांची बदली केल्याची टीका विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, मगो नेते सुदीन ढवळीकर व गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी काल केली.
भविष्यात गोव्यात पुन्हा
यायला आवडेल ः मलिक
गोमंतकीय जनतेने आपल्या दहा महिन्यांच्या कार्यकाळात भरपूर प्रेम दिले. गोमंतकीय जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो. भविष्यात पुन्हा गोव्यात यायला आवडेल, अशी प्रतिक्रिया मावळते राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काल व्यक्त केली. मावळते राज्यपाल मलिक आज बुधवारी गोव्यातून रवाना होणार आहेत. या पार्श्वभूमीवर गोमंतकीय जनतेचे जाहीर आभार मानले आहेत. निसर्गरम्य गोव्याची सेवा करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो. माझ्या दहा महिन्यांच्या कार्यकाळात आनंदाची अनुभूती घेतली आहे. गोमंतकीय नागरिकांकडून भरपूर प्रेम मिळाले आहे. गोव्यातील एकता आणि सुसंवाद कायम राहावा, असे मलिक यांनी म्हटले आहे.