राज्यपालांहस्ते उद्या ज्ञानपीठ पुरस्कार वितरण

0
5

प्रख्यात गीतकार गुलजार यांची उपस्थिती

गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई उद्या शनिवार दि. 27 मे रोजी राजभवनच्या नव्या दरबार हॉलमध्ये सायंकाळी 5 वाजता कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करतील.

या 57 व्या ज्ञानपीठ पुरस्कार सोहळ्याला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे उर्दू कवी, लेखक, गीतकार आणि चित्रपट निर्माते गुलजार विशेष अतिथी म्हणून आणि कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे हे सन्माननीय पाहुणे असतील.
भारतीय ज्ञानपीठाचे अध्यक्ष न्यायमूर्ती वीरेंद्र जैन आणि निवड मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती प्रतिभा राय, तसेच साहित्य, कला, नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

79 वर्षीय श्री. मावजो हे गोव्यातील कादंबरीकार, लघुकथा लेखक, समीक्षक आणि पटकथा लेखक आहेत. 1 ऑगस्ट 1944 रोजी गोव्यात जन्मलेल्या श्री मावजो यांनी मराठी प्राथमिक शिक्षणासोबतच पोर्तुगीज भाषेत प्रिमैरग्रांवपर्यंतचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यांनी मुंबईतील आर. ए. पोदार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून वाणिज्य शाखेत पदवी संपादन केली. त्यांच्या अनेक लघुकथा इंग्रजी, पोर्तुगीज आणि फ्रेंचमध्ये तसेच अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत.

एखाद्या कोकणी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी तो रवींद्र केळेकर यांना मिळाला होता. पुरस्कार सोहळ्याला जाण्यासाठी मडगाव आणि काणकोण येथून बसची व्यवस्था करण्यात आलेली असून मडगावसाठी सागर (9765661189) आणि काणकोणसाठी सज्जन (9923534647) यांच्याशी संपर्क साधावा.