राजीव गांधींमुळेच गोव्याला घटक राज्याचा दर्जा ः कामत

0
45

>> पणजी कॉंग्रेस भवनात राजीव गांधी जयंती

भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी गोव्याच्या कल्याणासाठी मोठे योगदान देताना केंद्रशासित प्रदेश असलेल्या गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळवून दिल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काल सांगितले. मात्र, बेजबाबदार अशा भाजप सरकारने गेल्या नऊ वर्षात राज्याचे तीन तेरा वाजवल्याचा आरोप कामत यांनी केला.

पुढे बोलताना ते म्हणाले की राजीव गांधी यांनी गोव्याच्या समृद्धीचे स्वप्न पाहिले होते. मात्र, सध्या राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने गोमंतकीयांची स्वप्ने उद्ध्वस्त केल्याचा आरोप दिगंबर का’त यांनी केला. काल पणजीत कॉंग्रेस भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राजीव गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कामत बोलत होते. भाजप राज्यातील लोकांची स्वप्ने पूर्ण करण्यास अपयशी ठरल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात पुन्हा कॉंग्रेस पक्ष सत्तेवर आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. २०२२ साली राज्यात कॉंग्रेस पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी कॉंग्रेसजनांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी, राजीव गांधी यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करून नगरपालिका व पंचायती ह्या स्वराज्य संस्थांच्या हाती प्रशासन सोपवले. सामान्य लोकांचे सबलीकरण करणे हे त्यांचे स्वप्न होते, असे सांगितले. खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी राजीव गांधी यांनी केलेल्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले. माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो हे गांधी यांच्याविषयी बोलताना म्हणाले की त्यांनी देशात तांत्रिक क्रांती घडवून आणली.