राजीनाम्याबाबत समितीने निर्णय घ्यावा

0
4

>> राष्ट्रवादीचे शरद पवार यांचे प्रतिपादन

>> समितीने बैठक 5 रोजी घेण्याची मागणी

आपण जी समिती गठीत केली आहे त्यात राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. ही समिती माझ्या राजीनाम्याबाबत बैठक घेऊन निर्णय घेणार आहे. परंतु समितीने 6 मे रोजी बैठक आयोजित केली आहे ती बैठक 5 मे रोजीच घ्यावी. या बैठकीत राजीनाम्याबाबत समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, असे काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले.

यावेळी पुढे बोलताना पवार यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मी पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होते, असे मला आता वाटत असून जर मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकपणे सर्वांनी मला विरोध केला असता असे मत व्यक्त केले. मी जर सर्वांना विश्वासात घेऊन राजीनाम्याचा निर्णय घेतला असता तर तो पक्षातील नेते आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मान्यच झाला नसता. त्यामुळे मी हा निर्णय कुणाला कळवला नव्हता असे स्पष्ट केले.

शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी, शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यामुळे लोकांना धक्का बसला आहे. मलाही या निर्णयाचा खूप मोठा धक्का बसला आहे. लोकांना हा धक्का पचेना. आत्तापासूनच लोक राजीनामे देऊ लागले आहेत. मी घरचीच आहे. पण त्यांच्यावर अत्यांतिक प्रेम करणारे लोक आहेत. त्यांच्यापासून साथीदार दुरावले पण ते डगमगले नाहीत असे सांगून सध्या देशात अराजकता माजली. आम्ही पुढच्या पिढीला काय देणार हा प्रश्न आहे. अस्वस्थ वातावरण असताना शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला हेच लोकांच्या पचनी पडत नसल्याचे सांगितले.

जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल प्रदेश सरचिटणीस या पदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारीही शरद पवारांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र पवार यांनी राजीनामा अद्याप मागे घेतलेला नाही. त्यानंतर आव्हाड यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.