कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय यांनी आपण न्यायमूर्ती पदाचा राजीनामा देणार असल्याचे रविवारी जाहीर केल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यांच्या राजीनाम्यामागे राजकीय कारण असल्याची चर्चा कोलकात्यामध्ये रंगली होती. त्यातच आपण राजकारणात जाण्याचा विचार करत असल्याचे सूतोवाचही गंगोपाध्याय यांनी केले होते. त्यानुसार काल कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही तासांत त्यांनी आपण भाजपमध्ये जात असल्याचे जाहीर केले. तसेच, यावेळी त्यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा पाहायला मिळाली.
माजी न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय यांनी मंगळवारी त्यांचा राजीनामा देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवला. तसेच, त्याची एक प्रत देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड व एक प्रत कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती टी. एस. शिवग्नानम यांच्याकडे पाठवली. यानंतर त्यांनी सॉल्ट लेक परिसरातील त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केली.
अभिजीत गंगोपाध्याय यांनी यावेळी आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. आपण भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. हा पक्षप्रवेश बहुधा येत्या 7 मार्च रोजी होईल. तृणमूल काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरोधात लढणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे; पण आगामी लोकसभा निवडणूक मी लढवेन की नाही, यावर पक्ष निर्णय घेईल, असेही गंगोपाध्याय म्हणाले.