जिल्हा पंचायत निवडणुकीतील दारुण अपयशानंतर कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी त्याची जबाबदारी स्वीकारून नुकताच राजीनामा दिला. एखाद्या निवडणुकीत अपयश पदरी पडताच त्याची जबाबदारी स्वीकारणे ही राजकीय पक्षांमध्ये प्रथा असते. त्यानुसार चोडणकर पायउतार झाले आहेत. अर्थात, तो स्वीकारला गेला आहे की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. यापूर्वीही एक दोन वेळा त्यांनी देऊ केलेला राजीनामा पक्षनेतृत्वाने स्वीकारला नव्हता, त्यामुळे यावेळी तो खरोखरच स्वीकारला जाईल याची शाश्वती नाही. चोडणकर यांनी आपला राजीनामा सोनिया गांधींना ईमेलद्वारे पाठविल्याचे सांगितले जाते. त्या सध्या पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष आहेत. राहुल गांधी रणांगण सोडून पळून गेल्यापासून कॉंग्रेस पक्षाला अद्याप पूर्णकालीक अध्यक्षच लाभलेला नाही. सध्याच्या पक्षाच्या या नेतृत्वहीन परिस्थितीविरुद्ध दिवसागणिक एकेक ज्येष्ठ कॉंग्रेसजन आवाज उठवून बाहेरचा रस्ता धरू लागले आहेत. २३ ज्येष्ठ नेत्यांनी पत्र लिहून पक्षाला आत्मचिंतनाचा सल्लाही देऊन झाला. त्यामुळे स्वतःच नेतृत्वहीन स्थितीमध्ये असलेल्या कॉंग्रेसच्या श्रेष्ठींनी कोणत्या तोंडाने चोडणकर यांचा राजीनामा स्वीकारायचा हाही प्रश्नच आहे. त्यामुळे यापूर्वी एक दोन वेळा त्यात चालढकल करून वेळ मारून नेण्यात आली. पराभवाची जबाबदारी स्वीकारून राज्यस्तरावरील नेत्याने राजीनामा द्यायचा आणि केंद्र स्तरावरील नेतृत्वाने तो फेटाळायचा हे नाटक असे कितीवेळा चालणार? किमान पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडुराव यांनी या राजीनाम्यासंदर्भात आपली व पक्षाची भूमिका स्पष्ट करणे जरूरी आहे.
कॉंग्रेस आज अशा स्थितीत आहे की, प्रदेशाध्यक्षपदासाठी स्पर्धा असण्याचे दिवस राहिलेले नाहीत. एखादे लोढणे गळ्यात पडावे तसे हे पद अनिच्छेनेच स्वीकारले जाताना दिसते. पक्षामध्ये काहीजण या मानासही इच्छुक आहेत हे खरे, परंतु पक्षाला नवसंजीवनी देण्याची आणि तळागाळापर्यंत पुन्हा नेण्याची त्यांची क्षमता आहे का आणि तशी अनुकूलता आता उरली आहे का याचाही विचार करावा लागेल. २०१७ च्या निवडणुकीत मतदारांनी भाजपला पर्याय म्हणून कॉंग्रेसला निवडून दिले होते, परंतु पक्ष तेव्हा सरकार स्थापन करू शकला नाही. त्या निवडणुकीत मिळालेल्या ऊर्जेतून कॉंग्रेसमध्ये थोडे उत्साहाचे वारे शिरायला हरकत नव्हती. परंतु त्यानंतर पक्षाचे निवडून आलेले दहाजण एका क्षणात भाजपच्या गोटात जाऊन बसले आणि कॉंग्रेस नेतृत्व मात्र हाय रे कर्मा करीत उरले. त्या घाऊक पक्षांतरासंबंधीचा जनतेचा संतापही ते तेव्हाच्या पोटनिवडणुकांत मतांमध्ये परिवर्तित करू शकले नाही. त्यानंतरच्या काळामध्ये आजवर नाना तर्हेची जनआंदोलने राज्यामध्ये उभी राहिली. गोवा फॉरवर्डपासून अगदी नवख्या आम आदमी पक्षापर्यंत सर्वांनी त्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन स्वतःची पाळेमुळे अधिक खोलवर रुजवण्याचा प्रयत्न चालवला. कॉंग्रेसने काय केले? नुसती रोजची पोकळ पत्रकबाजी, फुटकळ पत्रकार परिषदा आणि पोरकट आंदोलने यापलीकडे सुसंघटित पक्षकार्याचा प्रयत्न झालेला गोमंतकीय जनतेला कधी दिसलाच नाही.
मध्यंतरी पक्षप्रभारी दिनेश गुंडुराव उगवले आणि त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा करून ते निघूनही गेले. स्वबळावर निवडणुका लढवायला बळ उरले आहे कुठे? जिल्हा पंचायत निवडणुकीत तर जे काय थोडथोडके बळ उरले होते, तेही निर्णयप्रक्रियेतील विलंब आणि चुकीचे निर्णय यामुळे संपुष्टात आले आहे. दक्षिण गोव्याचे पक्षाचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावर सध्या ज्या तोफा डागल्या आहेत, त्या पुरेशा बोलक्या आहेत. पक्षातील ज्येष्ठांना विश्वासात घेतले जात नाही, नवखे नेते परस्पर निर्णय घेतात असा तक्रारीचा सूर त्यांनी लावला आहे. सार्दिन यांना हा चढा सूर लावण्याचा अधिकार जिल्हा पंचायत निवडणुकीतील त्यांच्या प्रभावक्षेत्राखालील सकारात्मक निकालांनी मिळवून दिला आहे. कॉंग्रेस पक्षाचे गोव्यातील दुखणे दुहेरी आहे. एक तर पक्षाचे बहुतेक ज्येष्ठ नेते सध्या अत्यंत धूर्त कातडीबचाऊ धोरण स्वीकारून करकोच्याप्रमाणे मातीत मान खुपसून स्वस्थ बसले आहेत आणि जे तरुण तुर्क आहेत, त्यांच्यापाशी फसफसता उत्साह जरूर आहे, परंतु नेतृत्व कशाशी खातात याची प्रगल्भता नाही. शिवाय दोहोंमध्ये संवाद नाही तो वेगळाच. याची परिणती बेदिलीत होणार नाही तर दुसरे काय होणार? एकसंध असा हा पक्ष कधीच दिसत नाही, मग मतदारांनी त्याला जवळ तरी का करावे? भाजपला पर्याय म्हणून स्वतःला पुढे करण्यासाठी गोवा फॉरवर्ड, आम आदमी पक्ष ज्या हिरीरीने प्रयत्नरत आहेत, ते पाहून कॉंग्रेसच्या धुरिणांना खरे तर लाज वाटायला हवी. कालपरवा निर्माण झालेले पक्षही कॉंग्रेसपेक्षा आज सुस्थितीत का आहेत? याचा विचार करणार नसाल तर नुसती माणसे बदलल्याने काय फरक पडणार आहे?