>> शिक्षक राजाराम परब यांच्याकडून अवघ्या 11 इंचाच्या पानावर कलाकृती
भगवान श्रीरामावरील श्रद्धेच्या महासागरात संपूर्ण देश भिजला आहे. प्रभू श्रीरामाच्या कार्यात प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या मार्गाने स्वतःला श्री राम मंदिराशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. डिचोली येथील सुप्रसिद्ध चित्रकार आणि ज्येष्ठ शिक्षक राजाराम परब यांनी 11 इंचाच्या पिंपळ पानावर सुंदररित्या प्रभू श्रीराम यांची कलाकृती साकारली असून, ती सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे. राजाराम परब यांनी पिंपळ पानाच्या एका बाजूला श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांचे चित्र साकारले आहे, तर पानाच्या दुसऱ्या बाजूला अयोध्येतील भव्य राम मंदिराचे चित्र साकारले आहे.
अयोध्येतील भव्य मंदिरात श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना देशातील सर्व हिंदू बांधव तसेच विविध कलाकारही उत्साहित असून, आपापल्या परीने आपल्या कलाकौशल्यातून श्रीरामाविषयीची भक्ती प्रकट करीत आहेत.
त्याच अनुषंगाने राजाराम परब यांनी 11 इंचाच्या पिंपळाच्या पानावर एका बाजूने श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांचे चित्र, तर दुसऱ्या बाजूला राम मंदिराचे चित्र रेखाटून आपल्या कलेच्या असामान्य कौशल्याचे दर्शन घडवले आहे. अशा प्रकारची कलाकृती पानावर साकारणे म्हणजे त्यांच्या कलेच्या दर्जाची प्रचिती येते. या कलाकृतीसाठी पिंपळ पानाचा वापर करण्यात आला असून, ते पान एक महिना पाण्यात भिजवत ठेवून त्यातील काही घटक काढून घेण्यात आले. त्यानंतर रासायनिक प्रक्रिया होऊन हे पान जाळीदार बनवण्यात आले. यानंतर रंगांचा वापर करून रेखाटलेले श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांचे चित्र रंगवण्यात आले. यानंतर दुसऱ्या बाजूने राम मंदिराचे चित्र रेखाटणे आणि रंगवणे सोपे काम नव्हते; मात्र परब यांनी आपल्या कलाकौशल्याची चुणूक दाखवत दुसऱ्या बाजूलाही चित्र रेखाटून त्यात रंग भरले. प्रभू श्रीराम व राम मंदिराचे रेखाटलेले चित्र सर्वांच्या आकर्षणाचा व चर्चेचा विषय बनले आहे. दरम्यान, यापूर्वी राजाराम परब यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे चित्र पिंपळाच्या पानावर रेखाटले होते.