राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी शनिवार दि. 25 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यातील विधानसभेच्या 200 जागांपैकी 199 जागांसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी 51,890 मतदान केंद्रे असून, 5 कोटी 25 लाख 38 हजार 655 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
राजस्थानात विधानसभा निवडणूक मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. सुरक्षा व्यवस्था देखील कडक ठेवण्यात आली असून, 1 लाख 70 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 51,890 मतदान केंद्रांवर आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानास प्रारंभ होईल आणि ते 5 वाजेपर्यंत चालेल. एकू मतदान केंद्रांपैकी 12500 मतदान केंद्रे संवेदनशील असून, त्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला जाणार आहे.
200 जागांपैकी 33 जागा अनुसूचित जातीसाठी, तर 25 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून, 142 जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत.
राजस्थान विधानसभेचा कार्यकाळ 14 जानेवारी 2024 रोजी संपुष्टात येत असल्याने त्यापूर्वीच राज्यात नवे सरकार येणे आवश्यक आहे. या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपमध्ये मुख्य लढत आहे. बसपा, आरएलपी, सपा, बीटीपी, डावे आणि आरएलडी आदी पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राजस्थानच्या साडेतीन दशकाच्या इतिहासात सत्तेच्या परिवर्तनाचा ट्रेंड राहिला आहे. राज्यात दर पाच वर्षाने सत्ता बदल हा भाजप आणि काँग्रेसमध्येच होत आला आहे.