राजस्थानातील मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट हा वाद उफाळून आला आहे. राज्यपाल कलराज मिश्रा यांच्यापर्यंत हे प्रकरण गेले आहे. सोमवारपासून विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याची मागणी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली होती. त्याला राज्यपालांनी नकार दिल्यानंतर मुख्यमंत्री गेहलोत सर्व आमदारांना घेऊन राजभवनात दाखल झाले. कॉंग्रेसच्या आमदारांनी राजभवनातच निदर्शने सुरू केली. सचिन पायलट यांच्यासह १९ आमदारांना दिलेल्या अपात्रता नोटीसीवर राजस्थान उच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे कॉंग्रेसचे लक्ष होते. मात्र, उच्च न्यायालयाने नोटीसीवर स्थगिती आणल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बहुमत चाचणीसाठी पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान या प्रकाराबाबत राज्यपालांनी गेहलोत यांची कानउघाडणी केली आहे.