काल रविवारी राजस्थान काँग्रेसच्या 32 ज्येष्ठ नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राजस्थान काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. प्रदेश भाजप कार्यालयात मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात दोन माजी मंत्र्यांसह या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये गेहलोत यांचे निकटवर्तीय आणि माजी कृषिमंत्री लालचंद कटारिया, माजी गृहराज्यमंत्री राजेंद्र यादव, नागौरचे शक्तिशाली जाट नेते आणि माजी आमदार रिचपाल मिर्धा, विजयपाल मिर्धा यांचा समावेश आहे.
पायलट यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी खासदार खिलाडी लाल बैरवा यांचाही या यादीत समावेश आहे. काल 32 जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यात निवृत्त ब्युरोक्रॅट्सचाही समावेश आहे.
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, भाजप प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत राजधानी जयपूर येथील भाजप प्रदेश कार्यालयात या नेत्यांचा भाजप प्रवेशाचा कार्यक्रम झाला. काँग्रेसच्या या नेत्यांसोबत त्यांचे बहुसंख्य कार्यकर्ते भाजपवासी झाले आहेत. त्यामुळे भाजपने आता 25 पैकी 25 जागांवर विजयाचा दावा केला आहे.
लालचंद कटारिया यांनी, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या आहेत. येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला पुढे नेण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही काम करणार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र, बिहारनंतर हिमाचल प्रदेशमध्येही कुरापती सुरु आहेत.
भिंदर यांची जनता सेना भाजपमध्ये विलीन झाली. रणधीर सिंह भिंदर आपल्या पत्नीसह भाजपमध्ये सहभागी झाले होते. भिंदर यांनी यावेळी, त्यांचा 11 वर्षांचा वनवास आज संपला आहे. आम्ही 11 वर्षे संघर्ष केला, पण काँग्रेसमध्ये गेलो नाही असे सांगितले.