राजस्थानच्या तीन मंत्र्यांचे राजीनाम्याविषयी पत्र

0
25

राजस्थानच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडत असून मुख्यमंत्री अशोेक गहलोत सरकारमधील तीन मंत्र्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मंत्रिपदावरुन पायउतार होऊन पक्ष संघटनेसाठी काम करण्याची इच्छा गहलोत सरकारमधील तीन मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचे दिसून येत आहे.

राजस्थान सरकारमधील रघू शर्मा, हरीश चौधरी आणि गोविंद सिंह डोटासरा यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन कॉंग्रेसच्या पक्ष बांधणीसाठी पूर्णवेळ काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती राजस्थान कॉंग्रेसचे प्रभारी अजय माकन यांनी दिली आहे. यासाठी तिन्ही मंत्र्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे.

दिवाळीआधीच राजस्थान सरकारमधील मंत्रिमंडळात बदलाचे वारे वाहू लागले होते. त्यामुळे राज्यात बदल करण्याच्या दृष्टीने कॉंग्रेस तयारी करत असून मंत्रिमंडळातील फेरबदलाची चर्चा सुरू आहे. राजस्थान कॉंग्रेसमध्ये सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यात तणाव सुरू असून राजस्थान कॉंग्रेसमधील संतुलन आणि संघटना मजबूत राखण्यासाठी काही संघटनात्मक बदलदेखील होणार असल्याचे कॉंग्रेसतर्फे सांगितले जात आहे.