राजधानी पणजीतील वाहतुकीवर नोव्हेंबरपासून २४ तास निगराणी

0
15

>> सीसीटीव्हींचे काम पूर्ण; प्रायोगिक तत्त्वावर काम सुरू

पणजी स्मार्ट सिटी योजनेअर्तंगत गोवा इंटेलिजेंट सिटी मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण झाले असून, सध्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची चाचणी घेतली आहे. या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या माध्यमातून पणजी परिसरात वाहतूक, सुरक्षा व अन्य घटनांवर २४ तास पाळत ठेवली जाणार आहे. या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा वापर नोव्हेंबरपासून अपेक्षित असून, त्यानंतर नियमभंग होणार नाही, याची विशेष खबरदारी वाहनचालकांना घ्यावी लागणार आहे; कारण पणजी शहरात वाहतूक नियमभंग करणार्‍या वाहनांचे क्रमांक स्वयंचलित पद्धतीने सीसीटीव्हीमध्ये कैद होणार असून, नियमाचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकाला दंडात्मक चलन जारी होणार आहे.
गोवा इंटेलिजेंट सिटी मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत सुमारे १८१ कोटी रुपयांची विविध कामे हाती घेण्यात आली असून, त्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सुविधेचाही समावेश आहे. लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) या कंपनीकडून सिटी मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत विविध कामे सुरू आहेत. या कंपनीकडून शहरातील सीसीटीव्ही व इतर सुविधांची पाच वर्षे हाताळणी आणि देखभाल केली जाणार आहे. या योजनेखाली बसविण्यात आलेला एखादा कॅमेरा नादुरुस्त झाल्यास नियंत्रण कक्षाला त्वरित माहिती प्राप्त होणार आहे. नियंत्रण कक्षातून संबंधित कंपनीला त्याबाबत माहिती दिल्यानंतर ठराविक कालावधीत संबंधित कॅमेर्‍याची दुरुस्ती कंपनीकडून केली जाणार आहे.

स्मार्ट सिटी योजनेखालील विविध प्रकल्पाच्या कामांना कोरोना महामारीमुळे विलंब झाला आहे. येत्या नोव्हेंबरपर्यंत विविध प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यात सीसीटीव्ही व्यवस्थेचेही औपचारिक उद्घाटन केले जाणार आहे.
राजधानी पणजी शहर आणि आसपासच्या परिसरात ७८ ठिकाणी ३२८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यात विविध प्रकारच्या कॅमेर्‍यांचा समावेश आहे. विविध प्रकारच्या कॅमेर्‍यांमध्ये पीटीझेड ४४, एफआरएस १०, एएनपीआर ८० कॅमेर्‍यांचा समावेश आहे.

पणजी शहरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे उद्घाटन झालेले नसले, तरी प्रायोगिक तत्त्वांवर कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. शहरात झालेल्या चोरीच्या काही घटनांचा छडा सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या साहाय्याने पोलिसांनी लावला आहे. शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांची नोंद होत आहे. सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या माध्यमातून पणजी शहराबरोबरच जुने गोवे, दोनापावला, बांबोळी, पर्वरी या भागात ये-जा करणार्‍या वाहनांवर देखरेख ठेवण्याचे काम होणार आहे.

नव्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची वैशिष्ट्ये

१. शहरात वाहतूक नियमभंग करणार्‍या वाहनांचे क्रमांक स्वयंचलित पद्धतीने टिपण्यासाठी एएनपीआरचे ८० बसविण्यात आले आहेत. ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन (Aएएनपीआर) ही अत्यंत अचूक यंत्रणा आहे. मानवी हस्तक्षेपाशिवाय वाहनांच्या नंबर प्लेट्स टिपण्यासाठी ही यंत्रणा सक्षम आहे. या कॅमेर्‍यातून टिपण्यात येणार्‍या छायाचित्राची नोंद नियंत्रण कक्षात होणार आहे.
२. शहरात सुमारे ४४ पॅन-टिल्ट-झूम (पीटीझेड) कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे यांत्रिक भागांसह तयार केलेले आहेत. कॅमेरे डावीकडून उजवीकडे फिरू शकतात, वर आणि खाली झुकतात आणि दृश्य झूम इन आणि झूम आउट करतात.

३. शहरात एफआरएसचे १० कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कोणत्याही एच २६५ फिक्स्ड आयपी आणि पीटीझेड वापरून रंगात आणि काळ्या-पांढर्‍या मोडमध्ये चेहरे शोधण्याच्या क्षमतेसह दिवस-रात्र ऑपरेशनला सहाय्य देणारे आहेत. एखाद्या गुन्हेगारांचा शोध घेण्याची क्षमता असलेले कॅमेरे सुध्दा काही प्रमुख सार्वजनिक ठिकाणी बसविण्यात आले आहेत.

राज्यातील सर्व रस्ते २-३ महिन्यांत
सीसीटीव्हीच्या कक्षेत : गुदिन्हो

गोव्यातील सर्व रस्ते येत्या २-३ महिन्यांत सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या निगराणीखाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी रस्ता सुरक्षा कार्यक्रमाच्या वेळी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर हा प्रकल्प हाती घेण्यात घेतला जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर कॅमेरे चोगम रस्त्यावर बसविण्यात येणार आहेत. कॅमेरे दिवसा तसेच रात्रीच्या वेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनांचा तपशील नोंद करण्यास सक्षम ठेवले जाणार आहेत, असेही गुदिन्हो यांनी सांगितले.

मद्यपींना सुरक्षितपणे टॅक्सीने घरी पाठविण्याची जबाबदारी मद्यालय मालकांवर देण्यावर विचार केला जात आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी कायदेशीर तरतूद करण्यासाठी चर्चा करणार आहे, अशी माहिती गुदिन्हो यांनी दिली.

राज्यात मद्यप्राशन करून वाहन चालविणार्‍यांविरोधात कडक कारवाई करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. वाहतूक खात्याच्या अधिकार्‍यांना कारवाईची सूचना केली जाणार आहे, असेही गुदिन्हो म्हणाले.

राज्य सरकार सार्वजनिक सेवा वाहतुकीचे ऍप तयार करण्याचा विचार करीत आहे, असे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.