>> संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर पलटवार
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस बजावल्याच्या पार्श्वभूमीवर काल श्री. राऊत यांनी भाजपचे केंद्रातील सरकार महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी हे दबावतंत्र वापरीत असल्याचा आरोप केला. आपल्याजवळ भारतीय जनता पक्षाच्या १२० नेत्यांच्या गैरकृत्यांची यादी असून सक्तवसुली संचालनालयाने पुढील पाच वर्षे त्याची चौकशी करावी असे आव्हान राऊत यांनी दिले. राजकीय विरोधकांच्या विरोधात केंद्रीय संस्थांचा गैरवापर केंद्र सरकारने चालवला असल्याचा आरोप राऊत यांनी केला. आपण कोणत्याही दडपणाला भीक घालत नसल्याने वैफल्यातून त्यांनी आपल्या पत्नीला लक्ष्य केले असल्याचे राऊत यांनी सांगितले.
तुम्ही जेव्हा तुमच्या विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवू शकत नाही, तेव्हा विरोधी पक्षातील नेत्यांच्या कुटुंबियांविरुद्ध ईडी किंवा सीबीआयसारखी हत्यारे उपसली जात आहेत अशी टीका राऊत यांनी केली. माझ्या पत्नीने घर बांधण्यासाठी दहा वर्षांपूर्वी घेतलेल्या पन्नास लाखांच्या कर्जासंदर्भात गेला दीड महिना आपला सक्तवसुली संचालनालयाशी पत्रव्यवहार सुरू आहे अशी माहिती राऊत यांनी दिली.