राजकीय क्षेत्रातील बालीशपणा…

0
249
  • देवेश कु. कडकड (डिचोली)

पक्षाने किती प्रमाणात बदलावे यालाही मर्यादा आहेत. आज शिवसेना आपली हिंदुत्वाची वस्त्रे उतरवून धर्मनिरपेक्ष बनली आहे. कॉंग्रेस राजीव गांधींच्या हत्येशी संबंधित गुन्हेगारांना सोडवण्याची भूमिका घेणार्‍या पक्षाशी आघाडी करते आहे, तर भाजपा सत्ता स्थापन करण्यासाठी भ्रष्टाचाराचे सर्वोच्च आरोप असलेल्या नेत्याला सोबत घेताना दिसते.

सध्या विविध राजकीय पक्षांमधल्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्या नेत्यांचे लांगुलचालन करणे चालू आहे. कोणत्याही मार्गाने नेत्यांचे लक्ष आपल्याकडे वळविण्यासाठी चढाओढ लागली आहे, तर नेत्यांमध्येही विविध बेलगाम विधाने करण्याची स्पर्धा सुरू आहे. अशाने अतिउत्साही कार्यकर्त्यांनाही चेव येतो. हल्लीचे राजकारण हे मूलभूत प्रश्‍नांवर चर्चा न होता वेगळ्याच दिशेने वळण घेत आहे, तसेच सत्तेत वाटा नसलेले आणि अडगळीत पडलेले काही नेते जुनी कथित गोपनीय माहिती उजेडात आणण्याचे नाटक करतात. याला राजकीय भाषेत ‘गौप्यस्फोट’ म्हणतात. यातून काहीही जनहित साधत नाही. फार तर माध्यमांतून काहीवेळ चर्चा होते, मनोरंजन होते आणि सत्तेपासून वंचित असलेल्या अशा नेत्यांना वैफल्यातून जरा मोकळीक मिळते.

गल्लीपासून दिल्लीपर्यंत कार्यकर्ते नेत्यांची खुशामत करण्यात गुंग आहेत. कोणाला आपला नेता प्रति शिवाजी वाटतो तर काहीजण आपल्या नेत्याला ‘जाणता राजा’ म्हणून संबोधतात. आजचे राजकारण हे व्यक्तीपूजेवर केंद्रित झाले आहे.

‘आपल्या देशात महापुरुषांचा पराभव होण्यास त्यांचेच पाठिराखे कारणीभूत असतात’ असे ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर यांनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी लिहून ठेवले आहे. आजही परिस्थिती फारशी बदललेली नाही, कारण आता राष्ट्रपुरुषाच्या नावाने प्रतिपक्षाच्या नेत्याला तलवारी उपसून कार्यकर्त्यांकडून शिव्या देण्याचे प्रकार घडत आहेत. भाजपाच्या एका कार्यकर्त्याने पुस्तक लिहून नरेंद्र मोदींना ‘आधुनिक काळातील शिवाजी’ अशी उपाधी देऊन आपल्या हुजरेगिरीचे प्रमाण दिले आहे. जेव्हा जेव्हा अस्मितेचा प्रश्‍न येतो, तेव्हा शिवाजी महाराजांसंबंधी कोणतीही तडजोड स्वीकारली जात नाही आणि त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, कारण शिवाजी महाराजांनी शून्यातून हिंदवी स्वराज्य निर्माण केले. त्यांनी एकोपा, संघटना उभी करून परकीय सत्तेविरुद्ध लढा दिला. त्यांच्या काळात एकाही शेतकर्‍याने आत्महत्या केली नाही. ही बाब अंगावर येते याची जाणीव होताच भाजपाने आपले दायित्व झटकले असले तरी या पुस्तकाला प्रथम पक्षाचा पाठिंबा होता हे काही लपून राहिलेले नाही. भाजपा हा शिस्तीत वाढलेला पक्ष आहे. त्यांची मातृसंघटना शिस्त, चारित्र्य यासाठी प्रसिद्ध आहे. त्या पक्षाकडून अशा बालीश प्रकाराला समर्थन मिळावे हे दुर्दैवी आहे. कॉंग्रेसच्या काही अतिउत्साही आणि अतिशहाण्या कार्यकर्त्यांनी इतिहासातील दखल न देण्यासारखी प्रकरणे उरकून काढण्याची उठाठेव चालवली आहे. सावरकर द्वेषाच्या उर्मीने कॉंग्रेस सेवादल नामक संघटनेने सावरकर हे वीर कसे नव्हते, हे दाखविण्याचा मूर्खपणा केला. त्यासाठी पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. विचारसरणीत मतभेद असतील तर त्याचा प्रतिवाद करण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र त्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा अधिकार कोणी दिला? यातून एकच साध्य झाले ते कॉंग्रेसची ‘सेवादल’ नामक संघटना अस्तित्वात आहे हे आजच्या पिढीला समजले हेही नसे थोडके. २०१४ साली भाजपचे सरकार आल्यानंतर कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांना ‘सावरकर’ या नावाच्या भीतीने पछाडले आहे.

आज सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाच्या इतिहासाबद्दल परिपूर्ण माहिती नाही. ऍलन ह्यूम यांनी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली होती हे आजच्या काळातल्या किती कॉंग्रेस कार्यकर्त्यांना माहीत आहे? तसेच दीनदयाळ उपाध्याय किंवा श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या तत्त्वांची उजळणी किती भाजप कार्यकर्ते करतात हाही एक प्रश्‍नच आहे. राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते यांच्यामध्ये ध्येयधोरणाचा ठसाच उरलेला नाही. म्हणून याबाबतीत त्यांच्यात गोंधळ आहे.

लोकशाहीत निवडणुका ही महत्त्वाची पायरी आहे. बिचारे सर्वपक्षीय कार्यकर्ते प्रचारादरम्यान एकमेकांशी भांडतात. अगदी टोकाचे शत्रुत्व पत्करतात. नेते मात्र ज्या पक्षाविरोधात लढले, ज्या नेत्यांविरुद्ध गरळ ओखली त्यांच्याशी संधान बांधून सत्ता काबीज करतात. अशावेळी सच्चे कार्यकर्ते तोंडघशी पडतात. आजच्या राजकारणात काळानुसार वर्तन ठेवले तरच इथे टिकाव लागतो. मात्र पक्षाने किती प्रमाणात बदलावे यालाही मर्यादा आहेत. आज शिवसेना आपली हिंदुत्वाची वस्त्रे उतरवून धर्मनिरपेक्ष बनली आहे. कॉंग्रेस राजीव गांधींच्या हत्येशी संबंधित गुन्हेगारांना सोडवण्याची भूमिका घेणार्‍या पक्षाशी आघाडी करते आहे, तर भाजपा सत्ता स्थापन करण्यासाठी भ्रष्टाचाराचे सर्वोच्च आरोप असलेल्या नेत्याला सोबत घेताना दिसते. प्रतिपक्षाच्या नेत्यावर आरोप करताना किती पातळीवर घसरावे याचे थोडेतरी भान जबाबदार पक्षाच्या नेत्याने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बाळगणे आवश्यक आहे. तरच निदान राजकीय वातावरण गढूळ होण्यापासून रोखण्यात मदत होईल. आपले पंतप्रधान हे हिटलर आहेत असा प्रचार विरोधकांनी वारंवार मुद्दाम केल्यामुळे आपल्या देशात हिटलरला जाणून घेण्यासाठी त्याच्या ‘माईन काम्फ’ या आत्मचरित्राला प्रचंड मागणी आहे. आज पुरोगामी समजल्या जाणार्‍या महाराष्ट्रात जातीपातींच्या राजकारणावरून मोठा संघर्ष होत आहे. ज्यांनी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ५० हून अधिक वर्षे घालवली ते शरद पवार हे ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर समाज यांच्यात दुही माजवण्याची एकही संधी सोडत नाहीत. एका कार्यक्रमात शरद पवारांचा उल्लेख ‘जाणता राजा’ असा झाला आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा उल्लेख उचलून घरला आणि ही उपाधी कायमची चिकटवली. ‘जाणता राजा’ ही उपाधी शिवाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामींनी दिली होती. शिवाजी महाराजांनी कधी स्वकीयांना दगा दिला नाही किंवा पाठीत खंजीर खुपसला नाही. तसेच जातीपातीचे राजकारण न करता अठरा पगड जाती आणि मुस्लिम, ख्रिश्‍चन धर्मियांच्या लोकांना स्वराज्यात सामावून घेतले. शरद पवार यांनी पुण्यात एका सभेत पुणेरी पगडी नाकारून महात्मा फुलेंची पगडी स्वीकारून ब्राह्मण समाजाचा उघडउघड अपमान केला होता. रामदास स्वामी हे महाराजांचे गुरु नव्हेत असे विधान शरद पवार संधी मिळताच करत असतात, हेसुद्धा ब्राह्मणद्वेषाचे एक उदाहरण आहे. गेली ५० वर्षे मराठा कार्डाचा आधार घेऊन सत्ता ताब्यात ठेवणार्‍या अशा नेत्यांचे सर्वांत मोठे राजकीय अपयश म्हणजे मराठा समाजाला आरक्षणासाठी मोठमोठी आंदोलने करावी लागतात. याच पवारांचे एक शिष्योत्तम जितेंद्र आव्हाड यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यास विरोध करताना गलीच्छ शिव्या दिल्या होत्या. बाबासाहेब पुरंदरेंमुळे शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रासमोर आला. त्यांनी संशोधनात आपले आयुष्य घालवले. रामदासस्वामींनी आपल्या लिखाणातून शिवाजी महाराजांची कीर्ती घराघरात पोहोचवली. नेते वादग्रस्त वक्तव्ये करतात. कार्यकर्ते समर्थन करतात. आजच्या कार्यकर्त्यांमध्ये सारासार विवेक न करता काही गोष्टींचा स्वीकार करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. इतिहासातील दखल न देता येणार्‍या वादग्रस्त गोष्टी उगाळत न बसता देशामध्ये जे भीषण आर्थिक संकट, बेरोजगारी आणि महागाई अशा अडचणींना सामोरे जाण्यासाठी तोडगा काढण्याचा राजकारण्यांनी प्रयत्न करावा.