राजकारण नको

0
123

बेताळभाटीत एका वीस वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या तिघा नराधमांना तातडीने आणि शिताङ्गीने जेरबंद करणारे पोलीस अभिनंदनास पात्र आहेत. कोणत्याही गुन्ह्याचा जर वेळीच तपास लागला नाही तर पोलीस टीकेचे लक्ष्य होत असतात, परंतु त्यांनी चांगली कामगिरी बजावली तर त्यांचे कौतुक करायला कोणी सहसा पुढे येत नाही. बेताळभाटीतील घटना अत्यंत धक्कादायक होती. तरुण -तरुणीला रोखून तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि वर खंडणीसाठीही प्रयत्न झाला. निर्ढावलेल्या सराईत गुन्हेगाराकडूनच अशा प्रकारचे कृत्य घडू शकते. पोलिसांनी रेल्वे ट्रॅकमन बनून, प्रवासी बनून संशयितांचा माग काढला आणि काही तासांत त्यांच्या मुसक्या आवळल्या. खरोखरच पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता कौतुकास्पद आहे. अटक झालेले तिघेही इंदूर, मध्य प्रदेशमधील निर्ढावलेले गुन्हेगार आहेत. ते परप्रांतीय असल्याने मुळातच परप्रांतीयांविषयी गोमंतकीयांच्या मनामध्ये दिसणारा राग उङ्गाळून आला आहे. पण शेवटी कोणताही गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. तो गोमंतकीय आहे की परप्रांतीय याने काही ङ्गरक पडत नाही. यापूर्वी काही विदेशी महिला पर्यटकांवर गोमंतकीय तरुणांकडून बलात्काराच्या घृणास्पद घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे गुन्हेगारांच्या परप्रांतीय असण्याचे भांडवल करण्याचे खरे तर काही कारण नाही. परंतु काही संघटना आणि व्यक्ती गुन्हेगार परप्रांतीय आहेत हाच मुख्य मुद्दा बनवू पाहात आहेत. अशाच काही घटकांनी मडगावात पोलीस स्थानकापुढे निदर्शने केली. विशेष म्हणजे महिला कॉंग्रेसच्या प्रतिमा कुतिन्हो आणि सहकार्‍यांचाही त्यात समावेश होता. ‘गुन्हेगारांना ङ्गासावर लटकवा’, ‘त्यांना आमच्या ताब्यात द्या’ अशा मागण्या म्हणे या महिला कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांपाशी केल्या. आता एखाद्या गुन्ह्यात गुन्हेगार पकडला गेला तर त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करणे हा पोलिसांचा अधिकार असतो. त्यांनी त्यात कसूर केली तर जाब विचारणे अथवा त्यांनी योग्य कारवाई करावी यासाठी आग्रह धरणे एकवेळ समजून घेता येते, परंतु गुन्हेगारांना आमच्या ताब्यात द्या, त्यांना आम्ही धडा शिकवतो असे म्हणणे हे खूप उथळपणाचे आहे. गुन्हेगाराने केलेला गुन्हा कितीही घृणास्पद असला तरी त्याला पोलीस ङ्गासावर देऊ शकत नाहीत. त्यासाठी न्याययंत्रणा आहे आणि कायद्याच्या सार्‍या प्रक्रियेतून त्यासाठी जावेच लागते. मग ते आपल्या मनात असो अथवा नसो. परंतु गुन्हेगारांना ङ्गासावर लटकवा, आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्यांना धडा शिकवतो अशा प्रकारच्या मागण्या करणे यात सामाजिक वातावरण तापवून त्याचा राजकीय लाभ उपटण्याचा मनसुबा पुरता स्पष्ट होतो. त्यातही गुन्हेगार परप्रांतीय असल्याने गोमंतकीय विरुद्ध परप्रांतीय असे वातावरण निर्माण करून सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न यामागे असू शकतो. घडलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने नागरिकांचा सारा रोष आणि राग विद्यमान सरकारच्या विरुद्ध वळवण्याचा चतुर प्रयत्न या अस्थानी निदर्शनांद्वारे महिला कॉंग्रेसने करून पाहिलेला दिसतो. हे सरकार अमली पदार्थ, मसाज पार्लर, कॅसिनो यांना उत्तेजन देणारे आहे, त्यामुळेच गोमंतकीय मुलींची अब्रू धोक्यात आहे असा संदेश त्यांना समाजाला द्यायचा असावा. बेताळभाटी प्रकरणातील गुन्हा किळसवाणा आहे आणि गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच हवी. परप्रांतीयांचा गोव्यातील वाढता वावर हेही येथील वाढत्या गुन्हेगारीचे एक प्रमुख कारण आहे हेही खरेच आहे. परंतु केवळ गुन्हा एखाद्या परप्रांतीयाने केलेला आहे म्हणून स्थानिक विरुद्ध परप्रांतीय असे वळण जर कोणी या विषयाला देऊ पाहात असेल तर त्याचे घातक परिणाम होऊ शकतात. गोवा हे पर्यटनाधारित राज्य आहे. मोठ्या संख्येने येथे देशी – विदेशी पर्यटक येत असतात. यापैकी काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असू शकतात, परंतु त्याचा राग सर्व पर्यटकांवर काढला जाऊ शकतो. किनारपट्टीमध्ये अशा अनेक हिंसक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यामुळे आपण कोणत्या धुमसत्या आगीला काडी लावतो आहोत आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचे भान सामाजिक चळवळीतील नेत्यांनी ठेवणे तितकेच गरजेचे आहे. अशा प्रकारचे गुन्हे होऊ नयेत यासाठी पोलिसांनी काय करायला हवे, तपास यंत्रणा कशी सक्षम करायला हवी यासंबंधी सूचना या सामाजिक कार्यकर्त्यांनी जरूर कराव्यात. तपासकामावर देखरेखही ठेवावी, परंतु पोलिसांच्या पुढील कायदेशीर प्रक्रियेमध्ये निष्कारण ढवळाढवळ करून त्यांचे लक्ष अन्य गोष्टींकडे वळवू नये. बेताळभाटी बलात्कार प्रकरणासारख्या घटना गोव्यात घडू नयेत यासाठी काय करता येईल यावर विचारमंथन व्हायला हवे. कोणीही गोव्यात यावे, गुन्हे करावेत आणि सुखाने पळून जावे हा शिरस्ता बनू पाहात आहे. त्यामुळे स्थानिक विरुद्ध परप्रांतीय अशा संघर्षाची बीजे समाजात रुजण्यापूर्वीच अशा घटकांवर नजर ठेवणारी व्यवस्था गोव्यात निर्माण करावी लागेल, जेणेकरून असे घृणास्पद गुन्हे पुन्हा घडणार नाहीत!