>> माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे प्रतिपादन
>> प्रतापसिंह राणेंच्या 85 व्या वाढदिनी लोटला जनसागर
मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत प्रतापसिंह राणे यांनी गोव्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली. त्यांचे कार्य वेळेपुरती मर्यादित नव्हते. निसर्गाला अभिप्रेत विकास करणे हे त्यांचे ध्येय होते व त्या ध्येयापर्यंत ते यशस्वीपणे पोहोचले. राज्यामध्ये आर्थिक विकासाला चालना मिळावी यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प गोव्यात आणले. आज ते प्रकल्प गोव्याचे भूषण म्हणून कार्यरत आहेत. जनतेच्या मनावर राज्य करणारे हे नेतृत्व होते. म्हणूनच पन्नास वर्षे त्यांनी अखंडितपणे आमदार म्हणून निवडून येण्याचा इतिहास घडविला. त्यांच्या विचारांमध्ये असलेला आदर्श आजच्या राजकारण्यांमध्ये येणे अत्यंत गरजेचे आहे. आदर्शवादी जीवन जगताना त्यांनी तरुणांपुढे अनेक सकारात्मक विचारांची ऊर्जा निर्माण केली आहे. यामुळे त्यांचे जीवन हे गोव्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मोलाचे असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या 85 व्या वाढदिवसा प्रित्यर्थ त्यांच्या धर्मपत्नी विजयादेवी राणे यांनी लिहिलेल्या ‘मेकर ऑफ मॉडर्न गोवा’ या पुस्तकाच्या अनावरण प्रसंगी श्री. प्रभू बोलत होते. पर्ये येथील भूमिका मैदानावर जवळपास 40 हजारांच्या आसपास उपस्थितांच्या साक्षीने सोहळा संपन्न झाला. या भव्य कार्यक्रमाला गोव्यातील जवळपास सर्व आमदार, माजी मुख्यमंत्री, सरकारच्या विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी व नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
माजी केंद्रीय मंत्री श्री. प्रभू यांनी सांगितले की, राजकीय क्षेत्रात वावरताना दीर्घकाळ नेतृत्व करण्याची संधी सहजासहजी कोणाला मिळत नाही. मात्र, ज्या जनतेवर आपण प्रेम केले त्यांच्या प्रलंबित असलेल्या समस्या सोडविण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले अशा नेत्यावर विश्वास ठेवणाऱ्या सत्तरी तालुक्यातील जनतेने राणे यांना ही संधी उपलब्ध करून दिली. हे खरोखरच त्यांचे भाग्य आहे. ईश्वराची साथ व त्यांच्या समर्थकांचे पाठबळ या बळावर त्यांनी आपले संपूर्ण जीवन राजकारणाच्या माध्यमातून जनतेच्या सेवेत व्यतीत केले. त्यांनी अनेक पदांना चांगल्या प्रकारे न्याय दिला. यामुळे त्यांचे कार्य तरुण पिढीला कायम प्रेरणा देत राहील असे त्यांनी सांगितले.
संयमी नेते : तानावडे
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानवडे यांनी मनोगत व्यक्त करताना प्रतापसिंह राणे यांनी संयमाने विविध पदांना चांगल्या प्रकारे न्याय दिला. मुख्यमंत्री असताना त्यांचे वागणे व विरोधी पक्षनेते पदाला त्यांनी चांगल्या प्रकारे उंची दिली. पारदर्शकपणे त्यांनी जनतेला वेगवेगळ्या स्तरावर मार्गदर्शन केले. जनतेच्या अपेक्षांना पात्र ठरलेले हे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आजही आपल्या मनात आनंद आहे. प्रशासनावर मजबूत पकड असलेले हे व्यक्तिमत्व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या राजकीय नेत्यांना आदर्श ठरणार असल्याचे ते म्हणाले.
आदर्शवादी व्यक्तिमत्व : श्रीपाद
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी यावेळी राणे यांचे अनेक किस्से आपल्या भाषणातून मांडले. आदर्शवादी व्यक्तिमत्व कसे असावे हा राणे यांचा आदर्श आजच्या तरुण पिढीने घेणे अत्यंत गरजेचे आहे. बदलत्या जीवन शैलीमुळे आज विचार बदलू लागलेले आहेत. राणे यांना अनेकवेळा संकटांचा सामना करावा लागला. मात्र, त्यांनी आपल्या भूमिकेशी सातत्याने ठाम राहण्याचा केलेला निश्चय हा आजच्या तरुण पिढीला आदर्शवत आहे, असे त्यांनी सांगितले.
हर्षदीप कौर यांच्या
गायनाला उत्स्फूर्त दाद
बॉलिवूडच्या लोकप्रिय गायिका हर्षदीप कौर यांचा सुरुवातीचा कार्यक्रम चांगलाच रंगला. त्यांनी सुरील्या आवाजात एकापेक्षा एक सुरेख गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रार्थना गीताने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर तिने विविध गाणी सादर करून उपस्थितांना रिझविले.
हेमा मालिनीचे नृत्य रंगले
बॉलिवूडमध्ये अनेक वर्षे आपल्या दिलखेचक अदाकारीने अनेकांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी यांच्या नृत्याने संध्याकाळ संस्मरणीय ठरली. तिचे नृत्य पाहण्यासाठी अनेकांनी आपल्या नजरा व्यासपीठाकडे केंद्रित केल्या होत्या. तिने सादर केलेल्या बहारदार नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.
सुरूवातीला पारंपरिक समई प्रज्वलित करून या शानदार कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचे उदयसिंग राणे, प्रसन्न गावस, रती गावकर, देवयानी गावस, राजश्री काळे, संध्या खाडीलकर, दीक्षा गावस, रोहिदास गावकर व सोमनाथ काळे यांनी पुष्पगुच्छ प्रदान करून स्वागत केले. सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये यांनी केले.
विकासाच्या बाबतीत
गोवा अग्रेसर ठेवा : प्रतापसिंह
यावेळी मनोगत व्यक्त करताना माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे म्हणाले की, गोव्याचे नेतृत्व कोणीही करू मात्र विकासाच्या बाबतीत गोव्याचा क्रमांक अव्वल ठरावा अशा प्रकारची भावना व्यक्त केली. येणाऱ्या काळात अनेक मुख्यमंत्री बनतील. मात्र, विकासाच्या बाबतीत गोवा मागे पडू नये. सत्तरी तालुक्यातील जनतेमुळे आपल्याला हा सुवर्णदिन पाण्याची संधी उपलब्ध झाली आहे. जनतेने आपल्याला दिलेले भरभरून प्रेम हे आपल्यासाठी मोठी भेट असल्याचे त्यांनी सांगितले.
विश्वजीत राणे भावुक!
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी प्रास्ताविक व स्वागत करताना भावुक झाले. सत्तरीच्या जनतेने ज्या पद्धतीने प्रतापसिंह राणे यांच्यावर प्रेम केले, विश्वास ठेवला हे खरोखरच महत्त्वाचे आहे. यामुळे सत्तरी तालुक्यातील जनता हा आपला परिवार आहे असे स्पष्ट करताना ते दोन वेळा भावुक झाले. अनेक वेळा कठीण काळात संघर्ष करावा लागला. मात्र, या वटवृक्षासमोर नतमस्तक होताना अनेक वेळा संघर्षातही यशाचा मार्ग सापडला. प्रतापसिंह राणे यांचा प्रवासा सर्वांसाठी आत्मविश्वास वाढविणारा आहे. वाळपई व पर्ये मतदार संघातील जनतेमुळेच हा सुवर्णदिन पाहण्याची संधी उपलब्ध झाली असे त्यांनी सांगितले.