गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून त्या पदासाठी पक्षात रस्सीखेच सुरू झाल्याचे दिसू लागले आहे. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यापासून गिरीश चोडणकर यांच्यापर्यंत अनेक नावे चर्चेत आहेत, परंतु ग्यानबाची मेख ही की, जोवर पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची संमती मिळत नाही, तोवर प्रदेशाध्यक्षपदावरील व्यक्तीची नियुक्ती लटकणार आहे. कॉंग्रेसच्या नुकत्याच झालेल्या महाअधिवेशनामध्ये राहुल गांधी यांनी पक्षातील खुर्च्या अडवून बसणार्या दुढ्ढाचार्यांना खालचा रस्ता दाखवणारे घणाघाती भाषण केले होते. कॉंग्रेसचे व्यासपीठ प्रथमच पूर्णपणे रिकामे ठेवण्यात आलेले होते आणि ज्येष्ठ नेत्यांच्या रांगांपलीकडे मागे बसलेल्या तरुण कार्यकर्त्यांना उद्देशून राहुल यांनी हे व्यासपीठ तुमच्यासाठी असेल अशी ग्वाही दिली होती. म्हणजेच राहुल गांधी यांना पक्षसंघटनेमध्ये नव्या रक्ताला वाव द्यायचा आहे. पक्षातील जुन्या मंडळींचे महत्त्व कमी करायचे आहे. सातत्याने ते हा विचार मांडत आले आहेत. मात्र, यंदाच्या महाअधिवेशनामध्ये त्यांनी एरव्ही ज्येष्ठ नेत्यांच्या मांदियाळीने गजबजणारे कॉंग्रेसचे व्यासपीठ पूर्ण रिकामे करून आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. गोवा प्रदेशाध्यक्षपदावरून शांताराम नाईक पायउतार झाले, गुजरातच्या प्रदेशाध्यक्षपदावरून भरतसिंह सोळंकी खाली उतरले, उत्तर प्रदेश प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदाची खुर्ची राज बब्बर यांनी सोडली. हे सगळे एका झटक्यात घडले तो राहुल यांच्या या घणाघाती भाषणाचा परिणाम होता. निव्वळ खुर्च्या अडवणार्या ज्येष्ठांना यापुढे तसे करता येणार नाही असा स्पष्ट संकेतच राहुल यांनी आपल्या भाषणात दिला होता. त्यामुळे आपली गच्छंती अटळ आहे हे उमगल्यानेच पक्षातील ज्येष्ठ – श्रेष्ठांनी आपापल्या खुर्च्या सोडण्याचा शहाणपणाचा निर्णय घ्यायला सुरूवात केली आहे. अखिल भारतीय कॉंग्रेस कार्यसमितीची निवड करण्याचे सर्वाधिकार महाअधिवेशनात राहुल गांधी यांनाच दिले गेले आहेत. त्यामुळे येणार्या काळामध्ये पक्षसंघटनेमध्ये मोठे फेरबदल राहुल गांधी आपल्या कल्पनेनुसार करू शकतात. गोव्यापासून दिल्लीपर्यंत हे घडणार आहे. राहुल गांधी यांच्यापाक्षी पक्षाच्या युवा आघाडीची जबाबदारी होती, तेव्हापासून ते नव्या रक्ताला वाव देण्याचा विचार सातत्याने मांडत आलेले आहेत. मात्र, आजवर त्यांच्यासाठी ते सोपे नव्हते. मात्र, आता सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाची माळ राहुल यांच्या गळ्यात घातल्यापासून त्यांना मनाला वाटेल तसे पक्षसंघटनेत फेरबदल करण्याचे अधिकार मिळाले आहेत. त्यामुळेच राहुल आपल्या स्वप्नातील पक्ष उभारणीच्या दृष्टीने प्रयत्न करू शकतात आणि दुढ्ढाचार्यांना हटवून तरुण तुर्कांना महत्त्वाची पदे देऊ शकतात. गोव्यामध्ये त्यामुळे गिरीश चोडणकर यांच्यासारख्या तरूण व पक्षसंघटनात माहीर असलेल्या नेत्याचे नाव पुढे येऊ शकते. दिगंबर कामत यांचे नाव चर्चेत आलेले आहे ते विजय सरदेसाई आणि त्यांच्या अलीकडच्या भेटीमुळे. कामत यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर सरदेसाई यांना भेटले त्यावरून कामत यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. राज्यातील सद्यस्थितीचा फायदा घेऊन कॉंग्रेसचे सरकार आणायचे असेल तर दिगंबर कामत यांच्यासारख्या ज्येष्ठालाच ते शक्य आहे हे जरी खरे असले तरी ‘जायका’ प्रकरणात कामत यांचे पाय पुरते अडकलेले असल्याने त्यांच्यासारख्या ‘कलंकित’ नेत्याकडे पक्षाची सुत्रे सोपवण्याचा निर्णय राहुल घेतील का हा प्रश्न आहे. त्यामुळेच चोडणकर यांचे पारडे तूर्त तरी जड वाटते. अर्थात, यामध्ये इतर हिशेबही असतील. पक्षातील अन्य मंडळींची मते आजमावली जातील. चेल्लाकुमार मग आपला अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठवतील आणि गोवा प्रदेशाध्यक्षपदाचे घोडे एकदाचे गंगेत न्हाईल. गोव्यातील विद्यमान राजकीय परिस्थितीमुळे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाला महत्त्व आलेले आहे हे नाकबुल करता येत नाही. कॉंग्रेस हा राज्यातील सर्वांत मोठा पक्ष आहे आणि विद्यमान राजकीय परिस्थितीत सरकार निर्नायकी स्थितीत आहे. सरकारच्या मित्रपक्षांमध्ये एकवाक्यता दिसत नाही. अशावेळी राज्यात सत्तापालटाचे स्वप्न कॉंग्रेसजन पाहू लागले तर नवल नाही. त्यामुळेच खरे तर प्रदेशाध्यक्षपदावर अनेकांचा डोळा आहे. लोकसभेच्या गेल्या काही पोटनिवडणुकांतून भाजपाच्या विरोधात निकाल गेलेले आहेत. त्यामुळे देशातील हवा बदलत असल्याच्या अपेक्षेने कॉंग्रेसच्या मंडळींच्या महत्त्वाकांक्षांना पालवी फुटलेली आहे. परंतु नेते भले दिवास्वप्ने पाहात असले तरी राज्यात पक्षसंघटना उरली आहे कुठे? त्यामुळे पक्षाला खरी गरज आहे ती संघटना बांधणीची. सरकार घडवण्याची स्वप्ने पाहण्यापेक्षा पायाखालची घसरत चाललेली वाळू सावरणे या घडीस अधिक मोलाचे ठरेल. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद हे मिरवण्यासाठी वा सत्तास्थापनेसाठी नसून राज्यातील पक्षाची ढासळलेली स्थिती सावरण्यासाठीचे एक साधन आहे या भूमिकेतून त्याकडे पाहणार्या व्यक्तीचीच वर्णी त्या पदावर लागली पाहिजे. सत्ता येण्यासाठी आधी मजबूत संघटना जरूरी असते. तरच ती टिकाऊ ठरते. अन्यथा पाचोळ्याप्रमाणे उडून जाते.