रस्त्यांसाठी गोव्याला 10 हजार कोटींचा निधी

0
15

>> नितीन गडकरींची माहिती; येत्या सहा महिन्यांत महामार्ग रुंदीकरणाच्या कामांना सुरुवात; नव्या झुआरी पुलाचे उद्घाटन

गोव्यात येत्या 6 महिन्यांत 10 हजार कोटी रुपयांची महामार्गाच्या रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. गोव्यातील अपघातप्रवण क्षेत्रांची सुधारणा करण्याच्या कामासाठी 177 कोटी रुपयांची गरज असून, अपघातप्रवण क्षेत्राच्या सुधारणांसाठी तात्काळ 100 कोटी रुपये मंजूर करण्यात येत आहेत, अशी घोषणा केंद्रीय रस्ता वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी झुआरी पुलाच्या दुसऱ्या चौपदरी मार्गिकेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना काल केली.

नितीन गडकरी यांनी काल नव्या झुआरी पुलाच्या दुसऱ्या मार्गिकचे उद्घाटन केले. यानंतर झुआरी पुलावरील फिरत्या रेस्टॉरंटच्या बांधकामाचा आणि पर्वरी येथील सहापदरी उड्डाण पुलाच्या बांधकामाचा शुभारंभ त्यांनी केला. ‘स्टेट ऑफ आर्ट’ नवीन झुवारी पूल हा गोव्याची लाइफलाइन असून, पुलावर अंदाजे 280 कोटी रुपये खर्चून पॅरिसच्या धर्तीवरील बांधण्यात येणाऱ्या फिरत्या रेस्टॉरंटमुळे हा पूल जागतिक आकर्षणाचे केंद्र बनेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

100 कोटी रुपये तात्काळ मंजूर
रस्ता अपघात आणि वाहतूक कोंडीपासून गोव्यातील नागरिकांची सुटका करण्याचे उद्दिष्ट आहे. गोव्यासह देशभरात अपघाताच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. गोव्यात अपघातप्रवण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी 177 कोटी रुपयांची गरज आहे. त्यातील 100 कोटी रुपये तात्काळ मंजूर केले जात आहेत, असे गडकरींनी सांगितले.

महामार्ग रुंदीकरणासाठी डीपीआरवर काम सुरू
गोव्यात आगामी सहा महिन्यांत अंदाजे 10 हजार कोटी रुपये खर्चाची विविध महामार्गाच्या रुंदीकरणाची कामे हाती घेतली जाणार आहेत. या महामार्गाच्या रुंदीकरणाचे आराखडे (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू आहे. नवीन महामार्गाच्या कामामध्ये कुंकळ्ळी, करमलघाट, नावेली, बाळ्ळी, अनमोड, मोले, फोंडा, भोम, जुने गोवे, ढवळी-बोरी आदी कामांचा समावेश आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.

महामार्गाची 98 कामे हाती
गोव्यात आत्तापर्यंत महामार्ग विकासाची सुमारे 98 कामे हाती घेण्यात आली आहेत, त्यातील 70 कामे पूर्ण झाली असून, 28 कामे प्रलंबित आहेत. आणखी 10 हजार कोटी रुपयांची 12 कामे प्रलंबित आहेत, असेही गडकरी यांनी सांगितले.

इलेक्ट्रिक वाहनांवर भर द्या
गोव्याला प्रदूषणापासून मुक्त ठेवण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यावर भर देण्याची गरज आहे. इथोनल, सीएनजी आदी हरित इंधनाचा वापर करावा. गोव्यातील बसगाड्या, टॅक्सी इलेक्ट्रिकवर आणण्यावर भर द्यावा, अशी सूचना गडकरी यांनी केली.

गोव्याला भरीव मदत द्या : मुख्यमंत्री
गडकरींच्या भाषणापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात विविध कामांसाठी गोव्याला मदत मिळावी, अशी मागणी त्यांच्याकडे केली. केंद्र सरकारने गोव्यातील अपघातप्रवण क्षेत्रांची सुधारणा करण्यासाठी 177 कोटी रुपयांची मदत करावी. तसेच करमल घाट, कुंक्कळी येथील बगल रस्त्यासाठी साहाय्य करावे. गोवा सरकारच्या रिंग रोडच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी. साखळी ते चोर्ला घाट या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव विचारात घ्यावा. राज्य सरकारने जी-20 बैठकांच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या दुरुस्तीवर सुमारे 450 कोटी रुपयांचा खर्च केला आहे, ती रक्कम केंद्र सरकारने परत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

अन्याय होणार नाही : नाईक
राज्यातील नागरिकांनी महामार्ग रुंदीकरणासाठी मोठे साहाय्य केले आहे. महामार्ग रुंदीकरणाच्या वेळी नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर योग्य तोडगा काढण्यात आलेला असून आगामी काळात सुध्दा रस्त्यांचे रुंदीकरण करताना कुणावरही अन्याय केला जाणार नाही, असे श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग, पर्यटन मंत्री रोहन खंवटे आदींची भाषणे झाली. मंत्री माविन गुदिन्हो यांनी स्वागत केले. यावेळी वीजमंत्री सुदिन ढवळीकर, कायदा मंत्री आलेक्स सिक्वेरा, मंत्री नीळकंठ हर्ळणकर, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री, आमदार नीलेश काब्राल, आमदार वीरेश बोरकर, आमदार आन्तोन वाझ, मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल उपस्थिती होते.