>> राज्यातील खड्डे ८ दिवसांत बुजविणार
राज्यातील रस्त्यांवरील खड्डे आठ दिवसांत बुजविण्यात येणार आहेत. नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग वगळून इतर रस्त्यांवरील खड्ड्याची छायाचित्रे वॉट्सऍप क्रमांक ७७९६६६७३७३ या क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल केले.
रस्त्यांवरील खड्डे सिमेंट कॉंक्रीटच्या साहाय्याने बुजविण्यात येणार आहेत. राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्यास रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती तातडीने होऊ शकते. रस्त्यांच्या कायम स्वरूपी दुरुस्तीचे काम नोव्हेंबर महिन्यानंतर हाती घेतले जाणार आहे. नोव्हेंबर महिन्यानंतर हॉटमिक्स प्रकल्प कार्यान्वित केला जातो, असेही पाऊसकर यांनी सांगितले.
राज्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम बांधकाम खात्याचे अधिकारी करून घेत आहेत. परंतु, पावसामुळे दुरुस्त केलेले रस्ते पुन्हा खराब होत आहेत. नागरिकांनी रस्त्यांवरील खड्ड्यांची छायाचित्रे पाठविल्यानंतर सदर छायाचित्रे संबंधित विभागातील अधिकार्यांना पाठविली जाणार आहेत. त्यानंतर संबंधित अधिकार्यांकडून त्वरित पाहणी करून खड्डे दुरुस्तीच्या कामाला चालना दिली जाणार आहे.
वॉट्सऍपवर छायाचित्रांचा
पाऊस पडेल ः दिगंबर
बांधकाम मंत्री पाऊसकर यांनी दिलेल्या वॉट्सअप क्रमांकावर राज्यातील विविध भागातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या छायाचित्रांचा पाऊस निश्चित पडेल, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केले आहे. बांधकाम मंत्री पाऊसकर यांनी खात्याचे अभियंत्ता आणि कंत्राटदारांच्या समवेत राज्यातील विविध भागात दौरा करून खड्ड्यांची माहिती जाणून घेऊन कृती करणे ही काळाची गरज आहे, असेही कामत यांनी म्हटले आहे.