राज्यातील भाजप सरकार अत्यंत असंवेदनशील आहे असा आरोप काल गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन वाहनचालक मृत्युमुखी पडत असतानाही सरकार रस्त्यांची दुरुस्ती करीत नाही. यातून त्यांची असंवेदनशीलता दिसून येत असल्याचे चोडणकर म्हणाले. सरकारने रस्त्यांच्या डागडुजीचे काम लवकर हाती घेतले नाही तर कॉंग्रेस पक्ष सदर प्रश्नावरून रास्ता रोको करण्यासही मागे पुढे पाहणार नसल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गेल्या पावसाळी अधिवेशनात चतुर्थीपूर्वी राज्यातील सर्व रस्त्यांची डागडुजी करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता चतुर्थी होऊन दिवाळी जवळ येऊन ठेपलेली असतानाही सरकारने रस्त्यांची डागडुजी केलेली नाही. यातून सरकारचा बेजबाबदारपणाच दिसून येत असल्याचे चोडणकर म्हणाले.
ज्या कंत्राटदारांनी या रस्त्यांचे डांबरीकरण केले होते त्या कंत्राटदारांवर सरकारने कारवाई करायला हवी. तसेच ज्या अभियंत्यांच्या निगराणीखाली हे रस्ते तयार करण्यात आले होते त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी असे चोडणकर म्हणाले. एकदा डांबरीकरण केले की तो रस्ता तीन वर्षे टिकायला हवा. पण प्रत्यक्षा रस्ता वर्षभरही टिकत नाही कारण अंदाजे खर्चापेक्षा २० टक्के कमी खर्चाच्या निविदा सादर केल्या जातात. मंत्री पैसे घेऊन त्या स्वीकारतात. हा भ्रष्टाचार असून त्यामुळेच रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे होत असते, असा आरोप चोडणकर यांनी केला.
सरकारने आता रस्त्यांच्या डागडुजीचे काम विनाविलंब हाती घेतले नाही तर कॉंग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा चोडणकर यानी दिला.
कॅसिनोंबाबत दिशाभूल
राज्यातील भाजप सरकार मांडवी नदीतील कॅसिनो तेथून हलवण्यात येणार असल्याचे सांगून जनतेची फसवणूक करीत आहे, असा आरोप काल प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. भाजप सरकार २०१२ सालापासून अशाच प्रकारे खाण व्यवसाय सुरू करण्यात येणार असल्याचे सांगून फसवणूक करीत आल्याचे चोडणकर म्हणाले. पूर्वी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सहा महिन्यांत कॅसिनो मांडवीतून हलवू असे सांगायचे, आता नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेही तसेच सांगत आहेत. पण हा जनतेला फसवण्याचा प्रकार असल्याचा आरोप चोडणकर यांनी केला. हे कॅसिनो तेथे जुन्या जुन्या कायद्याखाली चालू आहेत की नव्या हेही कुणाला माहीत नसल्याचे चोडणकर म्हणाले. हे कॅसिनो मांडवी नदीतून हलवण्यात येणार असल्याचे नाटक बंदर मंत्री मायकल लोबो व पणजीचे आमदार बाबुश मोन्सेर्रात हे करीत असल्याचा आरोपही यावेळी चोडणकर यांनी केला. बाबुश मोन्सेर्रात यांनी आमदार झाल्यानंतर मांडवी नदीतील कॅसिनो तेथून १०० दिवसांत हलवणार असल्याचे सांगितले होते पण त्यांना आता त्याचा विसर पडला असावा, असे चोडणकर म्हणाले.
भाजीच्या वाढत्या दराबाबत चिंता
राज्यात भाजीचे दर गगनाला भिडलेले असताना ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ते खाली आणण्यास सरकार पावले उचलत नसल्याबद्दल प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना चिंता व्यक्त केली.
राज्यात कॉंग्रेस सरकार सत्तेवर असताना काही काळ आपण फलोद्यान मंडळाचा अध्यक्ष होतो. त्यावेळी फलोद्यान महामंडळघला सबसिडी देण्यात येत असे. त्याद्वारे लोकांना स्वस्त दरात भाजी देण्यात येत असे. लोकांना कडधान्येही स्वस्त दरात देण्यात येत असे. ती पुरवण्यासाठी विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. आता योजना असूर्नीी या सबसिडीचा लाभ लोकांना मिळश्र नसल्याचा आरोप चोडणकर यांनी केला.
आता भाजपचे कार्यकर्ते ही योजना हाताळत असून त्यांना सरकारने कंत्राटे दिली आहेत. मात्र, ही सबसिडी मधल्यामध्ये भलतेच लोक मिळवत असल्याचा आरोप चोडणकर यांनी केला.