रस्ते गेले खड्ड्यात!

0
10
  • गुरुदास सावळ

पहिल्याच पावसात आपल्या रस्त्यांवर खड्डे पडतात. जून-जुलै या दोन महिन्यांत पावसाचा जोर वाढत असतो. रस्त्यावरील पाणी जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत खड्डे बुजवणे शक्य होत नाही. खड्डे बुजविण्याचे यंत्र कुचकामी ठरले आहे. त्यामुळे भर पावसात खड्डे बुजविण्याचे नवे तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. खड्डेमुक्त रस्ते हवे असतील तर काँक्रीटचे रस्ते बांधणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. त्याचा अभ्यास करून मोठ्या प्रमाणात वापर करणे शक्य आहे की काय याचा निर्णय घेतला तर निदान काही रस्ते तरी खड्डेमुक्त मिळतील.

जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेला पाऊस आता ऑगस्ट महिना संपला तरी धूमधडाक्यात कोसळतो आहे. एक मुरगाव वगळता इतर सर्व ठिकाणी दीडशे इंचावर पाऊस पोचला आहे. वाळपई व सांगे हे दोन तालुके तर यंदा नवे विक्रम नोंदविणार असे दिसते. मुसळधार पावसाने यंदा कहरच केला. या संततधार पावसामुळे गोव्यातील शेतीची अपरिमित हानी झाली. सखल भागातील शेतीत आठ-आठ दिवस पाणी साचून राहिल्याने भाताची रोपे कुजून गेली. पावसाने जराही विश्रांती न घेतल्याने परत लावणी करणे शक्य झाले नाही.

गोव्यातील अनेक शेतकऱ्यांनी परवडत नाही म्हणून शेतीभातीची कामे सोडून दिली आहेत. जे शेतकरी शेती करायचे त्यांची पावसाने पुरती वाट लावली आहे. या संततधारेमुळे केवळ शेतीवरच परिणाम झाला असे नव्हे, तर गोव्याच्या कानाकोपऱ्यांतील रस्त्यांची पावसाने पुरती दुर्दशा करून सोडली आहे. पणजी या राजधानीच्या शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेचे खापर स्मार्ट सिटीवर फोडण्यात येत आहे; पण पत्रादेवीपासून काणकोणमधील पैंगिण गावापर्यंत रस्त्याची जी धूळधाण झाली आहे त्याचे काय?
पणजी या राजधानीच्या शहरातील बांदोडकर मार्ग, महात्मा गांधी मार्ग व 18 जून मार्ग हे तीन प्रमुख रस्ते सोडले तर इतर सर्व रस्ते कुठे आहेत याचा शोध घेताना माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकाची जी घालमेल होते त्याला जबाबदार कोण?
आझाद मैदानावरून पालिका चौकाकडे जाणारा रस्ता नावालाही शिल्लक नाही. मळ्यातून भाटल्यात जाताना दुचाकी असो वा चारचाकी असो, जी सर्कस करावी लागते तिचे शब्दात वर्णन करणे माझ्यासारख्या सामान्य पामराला शक्य नाही. पणजी शहर हे खऱ्या अर्थाने आता गोव्याची राजधानी राहिलेली नाही. राजधानीतून राज्याचा कारभार चालविला जातो किंवा ज्या शहरातून राज्याचा कारभार चालतो ते शहर राजधानीचे ठरते. गोवा सरकारचे सचिवालय हे प्रशासनाचे प्रमुख केंद्र असते. ते सचिवालय पर्वरीत आहे. जेथे कायदेकानून संमत केले जातात ती विधानसभा पर्वरीत आहे. जेथे न्यायनिवाडा केला जातो ते उच्च न्यायालयही येथेच आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मंत्रालय, सत्तेचे केंद्र पर्वरीलाच आहे. मग पणजी राजधानी कशी?
पणजीतील रस्ते आणि खड्डे की खड्ड्यातील रस्ते हा विषय नेहमीच न्यायालयाच्या कार्यकक्षेत राहिलेला आहे. पणजीतील खड्डे विषय आजही न्यायालयात आहे. कधी जागरूक नागरिक न्यायालयात धाव घेतात, तर कधी न्यायालयच ‘सुओ मोटो’ म्हणजे स्वतःहून दखल घेतात. त्यासाठी एखाद्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेल्या बातमीचा आधार घेतला जातो. सरकारला नोटीस बजावली जाते आणि या प्रकरणात न्यायालयाला मदत करण्यासाठी एखाद्या वकिलाची नियुक्ती केली जाते.
पणजीतील स्मार्ट सिटीचे काम चालू असताना काकुलो मॉल परिसरातील रस्ता कित्येक महिने बंद राहिला. या मॉलचे मालक मनोज काकुले हे पणजीत बडे प्रस्थ. पोर्तुगीज काळात बोरौ पूल बांधणारे बडे कंत्राटदार. आजही त्यांची मोठी वट आहे. पण का कोण जाणे, काकुलो यांना बरेच सतावण्यात आले असा निदान माझा तरी समज झाला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने या परिसराचे तातडीने डांबरीकरण करण्यात येणार आहे. पण या परिसरात मोठ्या प्रमाणात खोदकाम झाले होते. खोदलेल्या ठिकाणी माती घालून, वर रोबल फिरवून डांबरीकरण करण्यात आले होते. खड्ड्यात घातलेली माती घट्ट व्हावी म्हणून कोणतेही काम केले नव्हते. त्यामुळे वाहनांची ये-जा वाढेल, त्या प्रमाणात मातीचा थर कमी होईल. डांबर उखडले जाईल.

ही समस्या केवळ काकुलो चौक परिसरातच आहे असे नव्हे, तर संपूर्ण स्मार्ट सिटीचे काम केले आहे त्या सर्व क्षेत्रांत ही समस्या उद्भवणार आहे. ज्या-ज्या ठिकाणी रस्ते खोदले होते तेथे जमीन स्थिर होईपर्यंत रस्ते खचणारच आहेत. ही जमीन स्थिर होण्यासाठी आणखी एक पावसाळा लागेल असे वाटते. 2025 चा पावसाळा संपला की परत एकदा शहरातील सर्वच रस्त्यांचे हॉटमिक्स करावे लागेल. त्यानंतर पणजीतील रस्त्यांची डागडुजी करण्याची गरज भासणार नाही असे वाटते.
गोव्यातील सर्वच रस्ते दरवर्षी पावसाळ्यात एवढे खराब का होतात हा प्रश्न मला गेली कित्येक वर्षे सतावत आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मी फार पूर्वीपासून प्रयत्नशील आहे. मुक्तिपूर्व काळात रस्त्यावर डांबर घालण्याचे काम साष्टी तालुक्यातील गावडा समाजातील कामगारच करायचे. पीटर कुलासो हा मोठा सरकारमान्य कंत्राटदार होता. त्या काळात रस्त्यावर रोबल मांडल्यानंतर त्यावर खडी घालत व डांबर कढवून फवारणी केली जात असे. अशा प्रकारे डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्याला पाच-सहा वर्षे काहीच होत नसे. त्याकाळी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कार्रेर कमी असायच्या. मालवाहतूक करणारे ट्रक मर्यादित मालाची वाहतूक करायचे. डांबरीकरण करताना जो रोलर फिरवीला जातो, तो फार तर आठ टनांपर्यंत असतो. त्यामुळे आठ टनांपेक्षा अधिक माल भरलेले वाहन या रस्त्यावरून गेले तर खडी व डांबर अलग होऊन रस्त्यावर खड्डे पडतात, असे पीटर कुलासो सांगायचे. आता आपल्या रस्त्यावरून केवळ सहाचाकीच नव्हे तर चौदा व सोळाचाकी वाहनेही अतिअवजड वाहतूक करतात. त्यामुळे रस्ते लगेच खराब होतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात माल वाहतूक करायची असल्यास त्यासाठी खास पद्धतीने रस्ते बांधावे लागतील.

रस्ते लगेच खराब होऊ नयेत म्हणून आता हॉटमिक्स तंत्रज्ञान वापरले जाते. डांबर व खडी यांचे चांगले मिश्रण व्हावे म्हणून डांबर कढवून त्यात यांत्रिक पद्धतीने खडी मिसळली जाते. त्यामुळे असे रस्ते दीर्घकाळ टिकतात अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात असे रस्तेही खराब होतात. त्याची इतर अनेक कारणेही असू शकतील. रस्ते तयार करण्याचे किंवा डांबरीकरण करण्याचे कंत्राट मिळवण्यासाठी किमान 10 ते 15 टक्के कमिशन द्यावे लागते, अशी सर्वच कंत्राटदारांची तक्रार आहे. काम पूर्ण झाले की बिल पास होण्यासाठी परत संबंधित अधिकाऱ्यांना बिलाच्या 10 टक्के रक्कम द्यावी लागते, अशीही कंत्राटदारांची तक्रार आहे. 20-25 टक्के अशा पद्धतीने दिल्यानंतरही पर्यवेक्षक आणि इतरांनाही चिरीमिरी द्यावीच लागते. या चिरीमिरीचा कामाच्या दर्जावर परिणाम होतो. त्यामुळे पूर्वी वर्ष दोन वर्षे सेवा देणारे रस्ते आता वाहतूक सुरू झाली की लगेच उखडून जातात.

यंदा कधी नव्हे तेवढा मुसळधार पाऊस सतत तीन महिने पडत आहे. मध्यंतरी 4-5 दिवस थोडीशी विश्रांती घेतली, पण आता सप्टेंबर महिना लागला तरी पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आपली जमीन खडकाळ असल्याने पाणी जमिनीत जिरत नाही. जमिनीवर पडणारे पाणी नदी-नाल्यांतून खळखळत अरबी समुद्राला मिळते. त्यामुळे रस्ते खराब होण्यास मदतच होते.

गोव्यात 150 इंचापेक्षा अधिक पाऊस गेल्या 100 वर्षांत कधी पडला नव्हता. मोठ्या प्रमाणात झाडे कापण्यात आली, त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले असा आपला समज झाला होता. पण यंदा एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस का पडला या प्रश्नाचे उत्तर कोणीच देत नाही. पावसाचे प्रमाण असेच चढते राहिले तर रस्त्यावरील खड्डे वाढतच जाणार. त्यामुळे असे काही खरोखरच घडले तर त्यावर मात कशी करायची याचा शोधा अभियंत्यांना घ्यावा लागेल.
पहिल्याच पावसात आपल्या रस्त्यांवर खड्डे पडतात. जून-जुलै या दोन महिन्यांत पावसाचा जोर वाढत असतो. रस्त्यावरील पाणी जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत खड्डे बुजवणे शक्य होत नाही. खड्डे बुजविण्याचे यंत्र कुचकामी ठरले आहे. त्यामुळे भर पावसात खड्डे बुजविण्याचे नवे तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. सरकारने आपल्या तरुण अभियंत्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. खड्डेमुक्त रस्ते हवे असतील तर काँक्रीटचे रस्ते बांधणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. मिरामार येथे त्याचा वापर करण्यात आला आहे. त्याचा अभ्यास करून मोठ्या प्रमाणात वापर करणे शक्य आहे की काय, याचा निर्णय घेतला तर निदान काही रस्ते तरी खड्डेमुक्त मिळतील.