राज्यात रस्ता सुरक्षा व्यवस्थापनासाठी सार्वजनिक बांधकाम खाते आणि वाहतूक खात्याने सुचविलेल्या विविध सूचना आणि उपायांची अंमलबजावणी येत्या दोन महिन्यांत करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. आल्तिनो-पणजी येथे कारखाने आणि बाष्पक खात्याच्या नवीन इमारतीची पायाभरणी केल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
राज्यातील वाढते वाहन अपघात चिंतेचा विषय बनलेला आहे. राज्यातील अपघात नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना केला. राज्यातील वाढत्या अपघाताचा अभ्यास एका कृती दलाकडून केला जात आहे. राज्यातील अपघाताच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आणि वाहतूक खात्याने काही उपाय सुचवले आहेत. या सूचनांची अंमलबजावणीसाठी साधारण 2 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने गतिरोधक उभारण्यासह रस्त्यांवर बॅरिकेट्स घालण्याचे काम सुरू केले आहे. काही ठिकाणी सिग्नल घालण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन्ही खात्यांना उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. राज्यातील वाढत्या अपघाताच्या प्रश्नावर दोन दिवसांपूर्वीच एक बैठक घेण्यात आली असून, संबंधित अधिकाऱ्यांना सूचनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.