रस्ता रुंदीकरणानंतर अपघात घटतील : सुदिन

0
103

राज्यात ७८ अपघात प्रवण क्षेत्रे
राज्यातील रस्त्याचे रुंदीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ते पूर्ण झाल्यानंतरच रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकेल, असे वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल विधानसभेत अपक्ष आमदार रोहन खंवटे यांच्या मूळ प्रश्‍नावर सांगितले. सरकारने सुमारे ७८ अपघात प्रवण क्षेत्रे शोधून काढली आहेत. त्यांची सुधारणा करण्यासाठी ५० कोटी रुपयांची गरज असल्याचे ते म्हणाले.
वाहतुकीवर पूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी मनुष्यबळाचीही गरज आहे. रस्ता सुरक्षेच्या बाबतीत अभ्यास करण्याचे काम सरकारने दिल्ली येथील सीआरआरआय या सरकारी संस्थेला दिल्याची माहिती ढवळीकर यांनी दिली. अपघातास जबाबदार असलेल्याचे परवाने रद्द का केले जात नाही, असा प्रश्‍न प्रमोद सावंत यांनी विचारला. कायद्यानुसारच कारवाई करावी लागते. अपघात झाल्यानंतर पंचनाम्याच्या वेळी हजर असणारे पंच न्यायालयात हजर होत नाही. त्यामुळे कारवाईस विलंब लागतो. चालकही सहीसलामत सुटतात. त्यामुळे कायद्यातच सुधारणा करण्याची गरज ढवळीकर यांनी व्यक्त केली. डॉ. सावंत व आमदार विष्णू वाघ यांनी या विषयावर मंत्र्यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला.
खासगी बसेस कदंबला जोडल्यास वाहतूक व्यवस्थेत सुधार
राज्यातील सर्व खासगी बस मालकांनी आपल्या बसगाड्या कदंबला जोडल्यास राज्यातील वाहतूक व्यवस्थेत बर्‍याच प्रमाणात सुधारणा करणे शक्य होईल. कदंब पासांची संख्या वाढविल्यास व कदंब बसेसच्या वेळापत्रकात बदल केल्यास खासगी बस मालकांच्या व्यवसायावर परिणाम होईल, असे वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल विधानसभेत आमदार किरण कांदोळकर यांच्या प्रश्‍नावर सांगितले.
कांदोळकर यांनी ढवळीकर यांना उपप्रश्‍न विचारून भंडावून सोडण्याचा प्रयत्न केला. मंत्री समाधानकारक उत्तरे देत नसल्याचा त्यांनी आरोप केला. महिलांना प्रत्येक बसमध्ये राखीव आसने असतात. त्या आसनांवर महिलांनाच बसता यावे अशी बसगाडीचा मालक व वाहकाची जबाबदारी असते, असे ढवळीकर यांनी सांगितले. काणकोण ते मडगाव मार्गावरील बस मालक कदंबकडे येण्यास तयार असल्याचे काब्राल यांनी सांगितले. त्यावर नुकसानीत जात असलेल्या मार्गावरील बसगाड्या ते कदंबला जोडण्यास तयार असतात, असे ढवळीकर यांनी सांगितले. शहरी वाहतूक सुधारण्यासाठी रेल्वे जाळ्याचीच गरज आहे व सरकार त्यावर अभ्यास करीत असल्याचे मंत्र्यांनी यावेळी सांगितले. शहर बसेस प्रवाशांना वेठीस धरीत असल्याचे आमदार बाबूश मोन्सेर्रात यांनी सांगितले.