
यजमान रशियाने आपल्या अ गटातील दुसर्या सामन्यात इजिप्तचा ३-१ अशा गोलफरकाने पराभव करीत विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत सर्वप्रथम प्रवेश करण्याचा मान मिळविला. पराभवामुळे इजिप्तचे आव्हान गट फेरीतच संपुष्टात आले.
आपल्या पहिल्या सामन्यात सौदी अरेबियाचा ५-० असा धुव्वा उडविलेल्या रशियन संघ पूर्ण आत्मविश्वासानिशी या सामन्यात उतरलेला दिसून आला. पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी आक्रमक खेळावर भर दिला होता. परंतु त्यांना या सत्रात गोलकोंडी सोडविता आली नव्हती.
दुसर्या सत्रात ४७व्या मिनिटाला इजिप्तच्या अहमद फतीने स्वयंगोल नोंदविल्याने रशियन संघाचे खाते खोलले गेले. त्यानंतर कर्णधार डेनिस चेरीशेव्हने ५९व्या मिनिटाला गोल नोंदवित रशियाची आघाडी २-० अशी केली. चेरीशेव्हचा हा यंदाच्या स्पर्धेतील तिसरा गोल ठरला. तर लगेच ६२व्या मिनिटाला आर्टेम झयूबाने गोल नोंदवित संघाला ३-० अशा आघाडीवर नेले. दुखापतीमुळे पहिला सामना हुकलेल्या इजिप्तच्या मोहम्मद सलाहने ७३व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल नोंदवित इजिप्तची पिछाडी ३-१ अशी भरून काढत सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतर मात्र त्यांना रशियन बचावफळी आणि गोलरक्षाकला भेदण्यात त्यांना अपयश आले.