>> रशियाच्या हल्ल्यात ४० सैनिकांसह १० नागरिक ठार; युक्रेनच्या प्रतिकारात ५० रशियन सैनिक ठार
गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध होईल, अशी जी भीती व्यक्त केली जात होती, ती अखेर काल खरी ठरली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन गुरुवारी सकाळीच युक्रेनमध्ये विशेष लष्करी कारवाईची घोषणा करत युद्धगर्जना केली. त्यानंतर रशियन सैन्याने युक्रेनमध्ये हल्ले करत राजधानी कीवला लक्ष्य केले. दिवसभरात रशियाने २०३ बॉम्बहल्ले केल्याचे युक्रेन पोलिसांनी म्हटले आहे. रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत ४० युक्रेनियन सैनिकांचा आणि १० नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर ९ जखमी झाले आहेत. त्यानंतर युक्रेनने केलेल्या प्रतिहल्ल्यात ५० रशियन सैनिक ठार झाले आहेत.
गुरुवारी सकाळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी विशेष लष्करी कारवाईच्या निर्णयाची माहिती देशवासियांना दिली. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर बॉम्बस्फोटांसाठी क्षेपणास्त्रांचा वापर केला. रशियाने डोन्बास प्रांतावर हल्ला करण्यासह युक्रेनच्या राजधानी कीववर हल्ला केल्याने मोठी खळबळ उडाली. खार्किव, ओडेसा, लुट्स्क, क्रामाटोर्स्क, इवानो फ्रांकिव्स्क, निप्रो, मारिओपोल आणि युक्रेनमधील इतर शहरांमध्ये जोरदार स्फोट झाले. युक्रेनमधील ११ विमानतळांसह ७० हून अधिक लष्करी आस्थापने उद्ध्वस्त केल्याचा दावा रशियाकडून करण्यात आला आहे. या हल्ल्यात ४० युक्रेनियन सैनिक आणि १० नागरिकांचा मृत्यू झाला. रशियाने हल्ला केल्यानंतर कीवमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. शहर सोडून जाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली. परिणामी रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांग रांगासह मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.
या हल्ल्याला युक्रेनने सुद्धा प्रत्युत्तर दिले आहे. रशियाची ६ विमाने आणि २ हेलिकॉप्टर पाडली असल्याचा दावा युक्रेनच्या सैन्याने केला आहे. तसेच पूर्वेकडील ६ युद्धनौका नष्ट केल्या आहेत. युक्रेनच्या लष्कराने आतापर्यंत ५० रशियन सैनिकांचा खात्मा केल्याचा दावाही केला आहे.
रशियाने युक्रेनवर असाच हल्ला सुरू ठेवला, तर त्याच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही १०० हून अधिक लढाऊ विमाने आणि १२० हून अधिक युद्धनौका हाय अलर्टवर ठेवली आहेत, असा इशारा नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी रशियाला दिला आहे.
१८ हजार भारतीयांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू
युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिती पाहून भारतीय दूतावासाने युक्रेनमधील तब्बल १८ हजार भारतीयांसाठी वारंवार सूचना दिल्या होत्या. तेथील परिस्थिती अधिकच चिघळल्यामुळे भारतीयांना एयरलिफ्ट करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. युद्धामुळे हवाई सीमा बंद आहेत. त्यामुळे भारतीयांना आणण्यासाठी इतर मार्गाचा विचार केला जात आहे. विदेश राज्य मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी सर्व भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
मोदींची पुतीन यांच्याशी चर्चा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री उशिरा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक राहिली. युद्धाने कोणतेही प्रश्न सुटू शकत नाहीत, असे नमूद करतानाच युक्रेनमधील हिंसाचार तत्काळ थांबला पाहिजे व तिथे शांतता प्रस्थापित व्हायला हवी, असे आवाहन मोदी यांनी पुतीन यांना केले. रशियाचा नाटो देशांशी वाद असेल, तर त्यावर युद्ध हा पर्याय असू शकत नाही. चर्चेतून हा वाद मिटवला पाहिजे, असे मोदी यांनी पुतीन यांना सांगितले.