रशियन पर्यटकाने तिघांना भोसकले

0
92

रशियन पर्यटकाने कांदोळी येथे काल सकाळी केलेल्या सुरीहल्ल्यात बागाराम देवानी (२२, कळंगुट), मुकेश थापा (३५, नेपाळ) व हनुमंत राम (२२, राजस्थान) हे तिघे जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी ऍडवर्ड पेत्रोविच गोरयाशंव याला अटक केली आहे. या घटनेमुळे कांदोळी भागात खळबळ माजली आहे.

जखमींपैकी दोघे दुकान मालक व एक रेन्ट अ बाईक मालक आहे. घटनेनंतर रशियनाने आपल्या दुचाकीवरून पळण्याचा प्रयत्न केला. हातात असलेल्या चाकूने त्याने लोकांना धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. सुमारे पंधरा पोलिसांच्या गटाने त्याचा पाठलाग केला. पोलीस पाठलाग करीत असल्याचे पाहून तो समुद्रातील पाण्यात शिरला. यावेळी स्थानिक लोकांनी त्याला पाण्यातून बाहेर काढून पोलिसांच्या स्वाधीन केले.
सदर संशयिताने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचा संशय आहे. संशयिताची चौकशी सुरू असून गंभीर जखमीवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.