>> येत्या निवडणुकीत भाजपला २७ पेक्षा अधिक जागा ः फडणवीस
फोंडा मतदारसंघात भाजपला आता रवी नाईक यांच्या रुपाने हिरा गवसला असून, येत्या निवडणुकीत २७ पेक्षा अधिक जागांवर भाजपचे कमळ फुलणार आहे, असा विश्वास भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
बेतोडा येथील सनग्रेस गार्डनमध्ये काल मंगळवारी फोंड्याचे माजी आमदार रवी नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व फडणवीस यांनी रवी नाईक यांच्या प्रवेशामुळे भाजप बळकट झाल्याचा दावा केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आमदार सुभाष शिरोडकर, दयानंद सोपटे, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, जयेश साळगावकर, भाजपच्या केंद्रीय निरीक्षक आशा लकडा, फोंड्यातील भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत यांनी, रवी नाईक यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपची ताकद दहापटीने वाढली आहे. यावेळेला फोंड्यात भाजपचे कमळ निश्चितच दिसणार आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्वप्नातील गोवा साकारण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. गोव्याच्या विकासासाठी वीस हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसा केंद्राने दिला आहे. त्यामुळेच तर आज विविध प्रकल्प साकारत आहेत. त्यामुळे यावेळेलाही गोमंतकीयांनी भाजपला साथ द्यावी, असे आवाहन केले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष तानावडे तसेच बाबू कवळेकर, सुभाष शिरोडकर, दयानंद सोपटे, जयेश साळगावकर यांनी भाजपशिवाय गोव्याला पर्याय नसल्याचा दावा केला.
फोंड्यातच नव्हे सर्वच
ठिकाणी भाजप ः रवी
रवी नाईक म्हणाले, केंद्रात नरेंद्र मोदी व राज्यात प्रमोद सावंत यांचे कार्य उल्लेखनीय आहे. सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन जाणार्या भाजपलाच लोकांची पसंती असेल. फोंडा तालुक्यातच नव्हे तर राज्यात इतरत्रही भाजपचेच आमदार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रवी नाईक यांनी दिला आमदारकीचा राजीनामा
कॉंगे्रस पक्षातील आमदारांचे पक्षाचा त्याग करुन अन्य पक्षात जाण्याचे सत्र चालूच असून काल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, फोंड्याचे आमदार व माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. रवी नाईक यांनी मंगळवारी सकाळी आपल्या आमदारकीचा राजीनामा सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे सुपूर्द केला.
रवी नाईक यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने राज्यातील कॉंग्रेस आमदारांची संख्या आता १७ वरुन ३ वर आली आहे. तर ४० सदस्यीय गोवा विधानसभेतील सदस्यांची संख्या आता ३७ एवढी झाली आहे.
सध्या रवी नाईक यांचे दोघेही पुत्र रॉय व रितेश नाईक यांनी बर्याच पूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता.