>> दीपक ढवळीकर यांच्याकडून स्पष्ट
फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी जरी भाजपमध्ये प्रवेश केला तरी फोंडा तालुक्यातील मगो पक्षाच्या अस्तित्वावर त्याचा काही एक परिणाम होणार नसल्याचे काल मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले. रवी नाईक भाजपमध्ये गेले म्हणून फोंडा तालुक्यात त्यांचे प्राबल्य थोडेच वाढणार आहे, असे ढवळीकर म्हणाले.
येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभव दिसू लागल्याने त्यांच्या पायाखालील जमीन सरकू लागली असल्याचे ढवळीकर म्हणाले आणि म्हणूनच त्यांनी आता स्वत:चे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी अन्य पक्षांतील आमदार फोडण्याचे सत्र आरंभिले आहे. मात्र, त्याचा त्यांना काहीही फायदा होणार नसून यातून त्यांचे नुकसानच होणार असल्याची प्रतिक्रिया ढवळीकर यांनी व्यक्त केली.
मगो व कॉंग्रेसचे आमदार फोडून झाल्यानंतर त्यांनी गोवा फॉरवर्डच्या आमदारांना रातोरात पळवले. मगोच्या आमदारांनाही असेच रात्रीच्या अंधारात पळवून नेण्याचे काम भाजपने केले होते. आता पुन्हा त्यांनी आपला मोर्चा कॉंग्रेस आमदारांकडे वळवला असल्याचे सांगून रवी नाईक हे भाजपमध्ये गेले म्हणून फोंडा तालुक्यातील मगोच्या अस्तित्वाला धक्का बसेल, असे कुणी समजू नये, असे ढवळीकर म्हणाले.
मगो पक्षाच्या आणखी एका नेत्याला पळवण्याची तयारीही त्यांनी चालवली असल्याचा आरोपही यावेळी ढवळीकर यांनी केला.