>> काँग्रेसचे नेते हर्षद शर्मा यांची पत्रकार परिषदेत माहिती
रविवार दि. 14 जानेवारीपासून काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा मणिपूर राज्यातून सुरू होणार असून 20 मार्च रोजी मुंबई येथे या यात्रेचा समारोप होणार आहे, अशी माहिती काल अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या माध्यम विभागाचे प्रमुख हर्षद शर्मा यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. देशात सध्या मोदी सरकारकडून लोकशाहीची हत्या सुरू असून त्याविरुद्ध आवाज उठवणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश असल्याचे शर्मा यांनी यावेळी स्पष्ट केले. गेल्या 160 दिवसांपासून मणिपूरमध्ये दंगल सुरू आहे. मात्र, अद्याप पंतप्रधान मोदी यांनी मणिपूरचा दौरा केलेला नाही. त्यामुळेच राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो न्याय यात्रेला प्रारंभ तेथून करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शर्मा म्हणाले.
या यात्रेतून राहुल गांधी हे आर्थिक न्याय, राजनीतीक न्याय व बेरोजगारी या तीन मुद्द्यांविषयी लोकांत जागृती घडवून आणणार आहेत.
यात्रा 110 जिल्हे व 15 राज्यांतून जाईल. ती एकूण 66 दिवस चालेल व यात्रेदरम्यान 6713 कि. मी. एवढे अंतर कापण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. ‘न्याय का हक्क मिलने तक’ हे या यात्रेचे घोषवाक्य असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले.
मणिपूरची परवानगी
काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा 14 जानेवारी रोजी मणिपूरच्या इम्फाळ पूर्व जिल्ह्यातून सुरू होणार आहे. राज्य सरकारने बुधवारी सायंकाळी त्यास मंजुरी दिली. मात्र, राज्यातील कायदा व सुव्यवस्था पाहता मर्यादित संख्येनेच या यात्रेत सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे. यासोबतच यात्रेत सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या आणि त्यांची नावे अगोदर दंडाधिकारी कार्यालयाला द्यावी लागणार आहेत. यापूर्वी प्रशासनाने सुरक्षेचे कारण देत या प्रवासाला परवानगी दिली नव्हती.
फूट पाडण्याचे कारस्थान उघड करण्यासाठी यात्रा खासदार सार्दिन यांची माहिती
केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून ते जाती व धर्मांच्या नावाने देशातील लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम नियोजनबद्ध रितीने करु लागले आहे आणि त्यांचे हे कटकारस्थान देशभरातील लोकांमध्ये जाऊन उघड करण्यासाठीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेचे आयोजन केले असल्याचे काल दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. गोवा प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर यानीही यावेळी मोदी सरकारवर टीका केली.
पुस्तिकेचे विमोचन
यावेळी राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेविषयीची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे विमोचन हर्षद शर्मा, फ्रान्सिस सार्दिन व अमित पाटकर यांनी केले. ही पुस्तिका गोव्यातील घराघरात वितरीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अमरनाथ पणजीकर हेही यावेळी उपस्थित होते.