गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांची मंत्रिपदी आणि मंत्री सुभाष फळदेसाई यांची सभापतिपदी वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गोवा विधानसभेचे सभापतिपद स्वीकारण्यास सोमवारपर्यंत असमर्थतता दशविणाऱ्या मंत्री सुभाष फळदेसाई यांनी पक्ष संघटनेकडून जी जबाबदारी दिली जाईल, ती स्वीकारेन, असे काल पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे वरील शक्यतेला अधिक बळकटी मिळाली आहे.
प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांना राज्य मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यानंतर रिक्त झालेली एक जागा भरण्यासाठी भाजपकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. सभापती रमेश तवडकर यांची मंत्रिपदी वर्णी लावल्यानंतर सभापतिपदी कुणाची नियुक्ती करायची यावर भाजपकडून विचारमंथन केले
जात आहे.
भाजपमधील अनेक आमदारांनी मंत्रिपदासाठी प्रयत्न चालविले असून, त्यात रमेश तवडकर यांचे नाव आघाडीवर आहे. राज्य मंत्रिमंडळातून आदिवासी समाजातील आमदाराला हटविण्यात आले आहे. त्यामुळे याच समाजातील दुसऱ्या आमदाराची वर्णी लावली जाणार आहे. रमेश तवडकर यांची मंत्रिपदी वर्णी लावण्यात येणार असल्याने सभापतिपदासाठी योग्य आमदाराच्या निवडीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
मंत्री सुभाष फळदेसाई यांचे नाव सभापतिपदासाठी चर्चेत आहे; मात्र त्यांनी सभापतिपद स्वीकारण्यास आपण तयार नसल्याचे सोमवारी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते. आपण भाजप पक्ष संघटनेचे काम करीत आहे. त्यात आत्ताच आपली मंत्रिपदी वर्णी लावण्यात आली आहे. आपल्याला मिळालेल्या मंत्रालयाच्या कारभारात आपण सुधारणा घडवून आणली. आपण भाजपच्या प्रचारासाठी नेहमीच आघाडीवर असतो. आपली सभापतिपदी निवड झाल्यानंतर भाजप संघटनेचे कार्य करण्यास मिळणार नाही, असे फळदेसाई यांनी म्हटले होते. तथापि, फळदेसाई यांच्याशी पक्षाच्या नेत्यांनी चर्चा केल्यानंतर ते सभापतिपद स्वीकारण्यास तयार झाल्याची चर्चा सुरू आहे.
सुभाष फळदेसाई यांची मंत्रिपदी वर्णी लागण्यापूर्वी गोवा विधानसभेच्या उपसभापतिपद भूषवले होते. फळदेसाई यांनी 30 मार्च 2022 ते 8 एप्रिल 2022 या काळात उपसभापतीपद भूषविले होते. भाजपकडून मंत्रिपदी त्यांचे नाव निश्चित झाल्यानंतर त्यांनी उपसभापतिपदाचा राजीनामा दिला होता.
…तर मंत्रिमंडळात आणखी एक जागा रिक्त होणार
मंत्री सुभाष फळदेसाईंची सभापतिपदी निवड झाल्यास मंत्रिमंडळातील आणखी एक जागा रिक्त होईल. परिणामी आणखी एका आमदाराला मंत्रिपदाची संधी मिळणार आहे.