गावकरवाडा – डोंगरमाथ्यावर खाण क्षेत्रात गेल्याबद्दल काल पर्यावरण कार्यकर्ते रमेश गावस व विद्यार्थ्यांना सेझा गोवाच्या अधिकार्यांनी अडवले. तसेच त्यांच्यावर बेकायदेशीररित्या कंपनीच्या जमिनीत प्रवेश केल्याची तक्रारही पोलिसांत नोंदवली. दरम्यान, विद्यार्थ्यांनी नेलेली गाडी काचा फोडलेल्या स्थितीत आढळली.
अधिक माहितीनुसार ऐतिहासिक ‘निमुझगा’चे चित्रीकरण करण्यासाठी आलेल्या बेंगलोर येथील विद्यार्थ्यांना घेऊन रमेश गावस गेले होते. त्या विद्यार्थ्यांना त्या वास्तूचे चित्रिकरण करायचे होते. हे विद्यार्थी गोव्यातील वास्तूंवर लघुपट बनवत असून त्यासाठी त्यांना चित्रिकरण करायचे होते. ही वास्तू पुरातत्त्व खात्याने संरक्षित केली असल्याने तिथे जाण्यापासून कोणी रोखू शकत नसल्याचे गावस यांचे म्हणणे आहे. शिवाय लिजे रद्द झाली असल्याने या जमिनीवर सेझा गोवाचा अधिकार नाही.
सेझाचे कार्यकारी व्यवस्थापक संदीप नाईक यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आपण खाणीच्या पाहणीसाठी गेलेलो असताना रमेश गावस व अन्य चार जण परवानगी न घेता आत येऊन चित्रिकरण करीत होते.