गेल्या १८ जुलै रोजी लांच घेताना अटक करण्यात आलेले सांकवाळ पंचायतीचे तात्कालीन सरपंच र’ाकांत बोरकर यांच्याविरुध्द लांच घेतानाची आणखी एक तक्रार आल्याने त्या प्रकरणी दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार विरोधी विभागाने त्यांच्याविरुध्द एफ्आय्आर् नोंद केली आहे. रमाकांत बोरकर यांनी बिल्डर एव्हेरतोन वालीस यांच्याकडे त्यांच्या इमारतीसाठीचे भोगवटा प्रमाणपत्र व शिल्लक राहिलेल्या अन्य बांधकामासाठी ना हरकत दाखला देण्यासाठी २ लाख रु.ची लांच घेतल्याची लेखी तक्रार नारायण दत्ता नाईक यांनी केल्यानंतर दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार विरोधी विभागाने रमाकांत बोरकर यांच्याविरुध्द एफ्आय्आर् नोंद केला आहे. बोरकर यांच्याबरोबरच अन्य तिघांजणांविरुध्दही तक्रार करण्यात आलेली आहे. तक्रारदाराने रमाकांत बोरकर हे लांच घेतानाची चित्रफीत सादर केलेली असून त्या चित्रफितीची शाहनिशा करून पाहिल्यानंतरच बोरकर यांच्याविरुध्द एफ्आय्आर् नोंद केला असल्याचे उपाधीक्षक बोसेत सिल्वा यांनी सांगितले. दरम्यान, आपणाला अटक होण्याच्या भीतीने रमाकांत बोरकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी म्हापसा येथील सीबीआय् न्यायालयात अर्ज केलेला असून सध्या ते भूमीगत झाले असल्याचे सिल्वा यांनी सांगितले. वरील अटकपूर्व जामीनावरील सुनावणी ९ सप्टेंबर रोजी होणार आहे. यापूर्वी रमाकांत बोरकर यांनी मुन्नालाल हलवाई यांच्याकडे अशाच प्रकारे भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी ७५ हजार रु. ची मागणी केली होती व ते स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली होती. त्याप्रकरणी सीबीआय न्यायालयाने त्याना जामीन मंजूर केला होता. मात्र, त्या घटनेनंतर त्यांची सरपंचपदावरून उचलबांगडी झाली होती. आता एफ्आय्आर् नोंद करण्यात आलेले प्रकरणही बर्याच दिवसांपूर्वीच आहे व त्यासाठीची तक्रार व व्हिडिओ सिडी आठवडाभरापूर्वी दक्षता खात्याच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाकडे करण्यात आली होती, असे बोसेत सिल्वा यांनी सांगितले.