गोवा मुक्तीलढ्याचा आवाज बनून भूमिगत रेडिओ केंद्र चालविण्याची असामान्य कामगिरी आपल्या पतीसमवेत बजावणाऱ्या, वयाची शंभरी पार केलेल्या स्वातंत्र्यसेनानी श्रीमती लिबिया लोबो सरदेसाई यांना त्यांच्या राष्ट्रकार्याचा गौरव म्हणून पद्मश्री किताबाने सन्मानित केले गेले हा समस्त गोमंतकीय जनतेसाठी अभिमानाचा क्षण आहे. आपल्या राष्ट्राचा विस्तार लक्षात घेता पद्म किताबास पात्र व्यक्तींची संख्या मोठी असते. त्यामुळे अशा सर्वांचीच योग्य वेळी दखल घेतली जाते असे नव्हे. लिबिया लोबो सरदेसाई यांना पद्मश्री जाहीर होण्यास तसा बराच विलंब झालेला आहे, परंतु उशिरा का होईना, त्यांची ह्या सन्मानासाठी निवड झाली ही आनंदाची बाब आहे. हा सन्मान स्वीकारण्यासाठी आणि त्याचा आस्वाद घेण्यासाठी आपण हयात आहोत याचा आपल्याला आनंद होत आहे आणि त्यातून आपल्या मनातील देशभक्ती अधिक प्रज्वलित झाली आहे आणि आपल्या आयुष्याची काही वर्षे तरी वाढली आहेत असे लिबिया कृतज्ञतेने म्हणाल्या. अशा अनेक रणरागिणी गोमंतकाच्या मुक्तिलढ्यामध्ये वावरल्या, ज्यांची आज समाजाला ना आठवण आहे, ना जाणीव. सिंधुताई देशपांडे, सुधाताई जोशी, सहोदरादेवी, वत्सला कीर्तनी, शारदाताई सावईकर अशा अनेक रणरागिणी गोवा मुक्तीच्या त्या समरामध्ये आपल्या तेजाने लखलखल्या. आपापल्या परीने त्यांनी त्या यज्ञामध्ये आहूती दिली. पोर्तुगिजांचा अनन्वित छळ सोसला, परंतु तिरंग्याप्रतीची आपली निष्ठा कमकुवत होऊ दिली नाही. लिबिया लोबो सरदेसाई आणि त्यांचे पती वामनराव सरदेसाई यांचे कार्य तर अजोड स्वरूपाचे आहे. गोव्याच्या सीमेवरून त्यांनी गोवा मुक्तीसाठी जनतेला जागृत करण्यासाठी भूमिगत रेडिओ केंद्र सुरू केले. पोर्तुगिजांच्या राजवटीत हे केवढे मोठे धाडस होते त्याची कल्पना आज येणार नाही, परंतु त्या भूमिगत रेडिओ केंद्राच्या माध्यमातून गोव्याच्या निद्रिस्त जनसमूहाला जागविण्याचे, चेतविण्याचे प्रयत्न ह्या दांपत्याने केले. आपल्या गोव्यासाठी आपण काहीतरी करायला हवे ह्या भावनेतून आपण हे शिवधनुष्य उचलल्याचे त्यांनी सांगितले होते. ज्या वर्षी त्यांनी हे भूमिगत रेडिओ केंद्र सुरू केले तो काळ गोमंतकाच्या मुक्तिलढ्यामध्ये नवी चेतना फुंकणारा होता. डॉ. राममनोहर लोहिया यांनी 18 जून 1946 रोजी नागरी स्वातंत्र्याचा पुकारा करून जनतेमध्ये चेतविलेली नागरी उठावाची ज्योत भारत सरकारचा पाठिंबा न मिळाल्याने आणि गांधीजींनी लोहियांनाही तिसऱ्यांदा गोव्यात परतण्यापासून परावृत्त केल्यामुळे विझल्यागत झाली होती. अशावेळी 1954, 1955 मध्ये पुन्हा एकवार मुक्तिसंग्रामाला चालना देण्याचे शर्थीचे प्रयत्न झाले. त्यासाठी सत्याग्रहींच्या लाटांवर लाटा उठल्या. पंधरा ऑगस्टला सत्याग्रह करणाऱ्या सत्याग्रहींवर अमानुष गोळीबार झाला. त्यामुळे देशभक्त गोमंतकीय संतापाने पेटून उठले. ह्या संतापाला दिशा देणे आवश्यक होते. त्यातूनच ह्या भूमिगत रेडिओ केंद्राची कल्पना पुढे आली. दादरा आणि नगरहवेलीच्या मुक्तीसंग्रामानंतर दोन रेडिओ ट्रान्समिटर स्वातंत्र्यसैनिकांच्या ताब्यात आले होते. त्यामुळेच वोझ दी लिबरेदाद किंवा गोंयचे सोडवणुकेचो आवाज ह्या नावाने हे रेडिओ केंद्र सुरू करण्यात आले. 1942 च्या चले जाव चळवळीमध्ये जेव्हा काँग्रेसच्या उच्चपदस्थ नेत्यांची धरपकड झाली आणि काँग्रेस संघटनेला निर्नायकी स्वरूप प्राप्त झाले, तेव्हा लोहियांच्या नेतृत्वाखाली अशाच प्रकारच्या भूमिगत रेडिओ केंद्रांची कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात आली होती. मुंबई आणि कलकत्त्यातील अशा भूमिगत रेडिओ केंद्रांनी ब्रिटीश सरकारची झोपच उडवली होती. उषा मेहतांसारखी रणरागिणी त्या रेडिओ केंद्राची जबाबदारी पेलण्यासाठी पुढे झाली होती. त्यावरून राष्ट्रीय नेत्यांची भाषणे व संदेश प्रक्षेपित केले जात होते, जे भारतीय जनता कानांत प्राण आणून ऐकतअसे. गोवा मुक्तीसंग्रामामध्येही अशाच प्रकारे भूमिगत रेडिओ केंद्राची आवश्यकता जेव्हा व्यक्त झाली, तेव्हा ती जबाबदारी स्वीकारून भारतीय लष्कराला त्यासाठी प्रक्षेपण केंद्र उभारण्यास ह्या दांपत्याने सहाय्य केले. गोव्याच्या जनतेमध्ये मुक्तीसाठी लढण्याची प्रेरणा देणे, पोर्तुगिजांची झोप उडवणे, त्यांचा अपप्रचार खोडून काढणे अशा अनेक प्रेरणा त्यामागे होत्या. कॅसलरॉकच्या जंगलात वन्य श्वापदे आणि जळवांशी सामना करीत सहा वर्षांहून अधिक काळ त्यांना त्यासाठी वास्तव्य करावे लागले. दिवसातून दोन वेळा हे प्रक्षेपण होई व त्यासाठी अठरा अठरा तास काम करावे लागे. पोर्तुगिजांनी त्यांच्या ध्वनिलहरी रोखण्याचा प्रयत्न करताच प्रक्षेपणात थोडासा तांत्रिक बदल करून त्यांनी तो प्रयत्नही हाणून पाडला. गोवा मुक्तीचा क्षण अनुभवण्याची अनोखी संधी देखील लिबिया यांना लाभली. त्या दिवशी लष्करी विमानातून गोमंतकीयांसाठी संदेश प्रक्षेपित करण्याची आणि पत्रके फेकण्याची अभूतपूर्व कामगिरी त्यांनी करून दाखवली. केवळ भूमिगत रेडिओ केंद्र चालवले एवढीच लिबिया यांची कामगिरी नाही. गोव्यातील पहिल्या महिला वकील हा मानही त्यांच्याकडे जातो. अशा ह्या झुंजार महिलेचा हा सन्मान गोमंतकाची मान उंचावणाराच म्हणावा लागेल.